• Sun. Sep 22nd, 2024

सामाजिक सभागृहातून मानवतेचा संदेश जावा- सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Apr 9, 2023
सामाजिक सभागृहातून मानवतेचा संदेश जावा- सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद

चंद्रपूर, दि. 09 : सामाजिक सभागृहाचा उपयोग समाज एकत्र राहावा, विविध संस्कारक्षम विचारांवर येथे संवाद होवून जीवन जगण्याचा खरा सत्याचा मार्ग शोधता यावा तसेच या सभागृहातून मानवतेचा संदेश जावा, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

25/15 ग्रामीण विकास निधी अंतर्गत ऊर्जानगर, केसरीनंदन नगर येथील 40 लक्ष रुपये निधीतून निर्मित सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, ऊर्जानगरच्या सरपंच मंजुषा येरगुडे, उपसरपंच अंकित चिकटे, रामपाल सिंह, नामदेव डाहुले, माजी पंचायत समिती सभापती केमा रायपुरे,

माजी जिल्हा परिषद सदस्य वनिता आसुटकर, नामदेव आसुटकर, चंद्रप्रकाश गौरकार, हनुमान मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष उत्तमराव पाटील व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अर्थमंत्री असताना येथील नागरिकांच्या मागणीनुसार 25/15 ग्रामविकास या शिर्षाखाली 40 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या निधीतून या सभागृहाचे बांधकाम झाले. सभागृहाचे निर्माण हनुमान मंदिराच्या बाजूला करण्यात आले आहे. या सभागृहाचा उपयोग समाजाला एकत्र ठेवण्यासाठी करावा. एकविसाव्या शतकात माणूस माणसापासून दूर चालला आहे. इमारती उंच झाल्यात माणसे मात्र खुजी झाली. सभागृहे मोठी, भव्यदिव्य झाली पण माणसाचे हृदय मात्र संकुचित झाले आहे. त्यामुळे या सभागृहातून सेवेचा झरा वाहावा. सांस्कृतिक विषय, अध्यात्मिक, प्रेम, सहकार्य, सेवा,पर्यावरण व आपुलकी तसेच या सभागृहातून उत्तमातून उत्तम मनुष्य घडविण्यासाठी विचार व्हावा, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

कोंडी (नेरी)दुर्गापुर येथे काँक्रीट रोड बांधकामाचे लोकार्पण

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कोंडी (नेरी) येथे 30 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री म्हणाले म्हणाले, दोन वर्षाअगोदर मुख्य रस्त्याला जोडून असणाऱ्या रस्त्याचे आपण लोकार्पण केले. मात्र, पुढचाही सिमेंट रस्ता करावा अशी मागणी या प्रभागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी केली होती. या काँक्रीट रस्त्यासाठी खनिज विकास निधीतून 30 लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला व आज या रस्त्याचे लोकार्पण पार पडत आहे.

या गावातील पाणीपुरवठा योजना, पिण्याचे शुद्ध पाणी (आरो), एलईडी लाईट तसेच वार्ड क्र. 3 चा प्रश्न सोडवण्यासाठी 26 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. तुकूमपासून मोहर्लीपर्यंतचा रस्ता अप्रतिम होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर दुर्गापुरचा रस्ता अप्रतिम करण्यात येईल. या रस्त्यावरून जो कोणी जाईल तेव्हा निश्चितपणे नागपूरच्या जी-20 नंतर झालेल्या रस्त्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, इतके सुंदर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची नोंद इतर जिल्ह्यांनी घ्यावी, असे आपले स्वप्न व ध्येय असल्याचे ते म्हणाले.

बल्लारपूर मतदार संघाइतका विकास महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्याच्या मतदारसंघात झालेला नाही. या अर्थसंकल्पात साधारणतः पद्मापूर ते मोहर्ली रस्ता उत्तम करण्यासाठी 20 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे.

तसेच दुर्गापूर ते ट्राफिक ऑफिस हा सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी 6 कोटी रु. तर पूर्ण रस्ता, लाईट व इतर गोष्टीसाठी 7 कोटी 30 लक्ष मंजूर केले आहे. रमाई आवास व शबरी आवास योजनेतून दुर्गापुर वासियांना घरे बांधून देण्यात येणार आहे. तसेच 14 एप्रिल रोजी भटक्या जमातीच्या लोकांसाठी 2803 घरांचे चेक देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed