ममुराबाद येथील रहिवासी जगदीश पाटील हा तरुण जळगाव शहरातील एमआयडीसीतील एका कंपनीत कामगार म्हणून कामाला होता. शनिवारी जगदीश हा कामवार गेला नाही. त्याचे आई वडील दोघेही कामानिमित्ताने घराबाहेर गेल्याने जगदीश हा घरी हा एकटाच होता. यादरम्यान घरी एकट्या असलेल्या जगदीशने टोकाचं पाऊल उचललं. राहत्या घरात जगदीशने छताला लोखंडी आसारीच्या कडीला लावलेल्या पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या करत जीवन संपविले.
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जगदीशचे आई – वडील घरी परतले. दरवाजा उघडाच त्यांना घरात जगदीश याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. जगदीशला पाहून आई – वडीलांना धक्काच बसला आणि त्यांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी जगदीश यास मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लग्न होत नसल्याने होता तणावात
जगदीश हा ममुराबाद येथे आई – वडीलांसह वास्तव्यास होता. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पाटील कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जगदीश याचे काका यांनी तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या माहितीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जगदीश याचे लग्न होत नसल्याने तो तणावात होता. याच कारणामुळे तो दारु पित होता. लग्नाच्या विचारातूनच जगदीश याने आत्महत्या केल्याचे जगदीशच्या काकांनी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.