• Mon. Nov 25th, 2024

    भाजीपाला गुणवत्ता केंद्रातील  खरबूज लागवड तंत्रज्ञान – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 9, 2023
    भाजीपाला गुणवत्ता केंद्रातील  खरबूज लागवड तंत्रज्ञान – महासंवाद

    बारामती येथील कृषि विज्ञान केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्राने शेतकरी बांधवांची सध्याची अडचण दूर करण्यासाठी पॉलिहाऊसमध्ये बिगर हंगामी खरबूज या पिकाची लागवड करून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन करण्यासाठी ‘हॅगींग’ खरबूज लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे.

    भाजीपाला गुणवत्ता केंद्रात नेदरलँडच्या शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडक पॉलिहाऊसधारक शेतकऱ्यांसाठी ‘मूल्य साखळी विकास कार्यशाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

    पॉलीहाऊस खरबूज (हॅगींग) उत्पादन तंत्रज्ञान

    खरबूज पिकाची लागवड पूर्वी फक्त नदीकडेच्या क्षेत्रात होत होती. मात्र आता या पिकाची लागवड व्यापारी तत्वावर पॉलीहाऊसमध्येही करण्यात येत आहे. पॉलीहाऊसमधील नियंत्रित वातावरणामध्ये वर्षभर लागवड करता येते. पिकाचा कीड व रोग यापासून चांगल्याप्रकारे संरक्षण करता येते. फळधारणा चांगल्या प्रकारे होते, तसेच पाणी आणि खत व्यवस्थापन उत्तम प्रकारे करता येते.

    महात्मा फुले कृषि विद्यापीठाने पुसा सरबती, हरामधू व दुर्गापुरा मधु या वाणांची लागवडीसाठी शिफारस केली आहे. पॉलीहाऊस मध्ये खरबूजाची लागवड करण्यासाठी  नोन यु कंपनी या कंपनीचे मधुमती, अलीया, माधुरी-२ या वाणांची शिफारस केली आहे.  पॉलीहाऊसमध्ये लागवड करताना उंच गादीवाफे तयार करून खरबूजाची लागवड केली जाते.

    दोन गादीवाफ्यामधील अंतर ४ फुट  आणि दोन रोपांमधील अंतर १.५ फुट ठेवावे. गादीवाफा उंची १.५ फुट व रुंदी २ फुट असावी. १० गुंठ्यामधील रोपांची संख्या २ हजार ४०० ते २ हजार ४५० इतकी असावी.

    छाटणी व परागीभवन तंत्रज्ञान

    मुख्य वेलीला येणाऱ्या बाजूच्या फांद्या वेळोवेळी काढणे अत्यंत गरजेचे असते. येणाऱ्या पहिल्या ७ ते १० पानानंतर पहिल्या फळांची फलधारणा करून घेणे गरजेचे आहे. परागीभवन योग्य वेळ सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ४ ते ६ या कालावधीमध्ये करावे. एका वेळी शक्यतो एकच फळ ठेवावे. परागीभवन करत असताना वातावरणातील आदर्ता ८० टक्के असावी.

    परागीभवन केल्यानंतर ५० ते ५५ दिवसांमध्ये खरबुजाचे फळ काढणीस तयार होते.फळ   काढणीस आल्यानंतर  रीफ्रॉक्टोमीटरच्या सहाय्याने यातील साखरेचे प्रमाण १४ ते १५ ब्रिक्स झाल्यानंतर याची काढणी करावी. प्रत्येक वेलीला साधारणतः १.५ ते २.० किलो पर्यंत फळांचे उत्पादन मिळते.

     खरबूज पिकाचे पाणी व्यवस्थापन

    खरबूज हे पिक अत्यंत जास्त पाण्याला बळी पडणारे पिक असून, यामध्ये पाण्याचे योग्य नियोजन खूप महत्त्वाचे आहे. ठिबक सिंचन या पद्धतीचा अवलंब करणे अतिशय गरजेचे असून शक्यतो ४ लिटर प्रति तास क्षमता असणारी डिप लाईनची निवड करावी. ढगाळ वातावरण असेल तर अतिशय कमी पाणी लागते. खरबुजाला फळधारणा तसेच फळ फुगवण कालावधीमध्ये जास्त पाणी लागते. २ ते ३ लिटर पाणी प्रति झाड प्रति दिन याप्रमाणे आपण पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

     खरबूज पिकाचे खत व्यवस्थापन

    प्रति हेक्टर २०० :१००: १०० नत्रः स्फुरद : पालाश प्रती हेक्टर द्यावे. नायट्रोजनची मात्रा लागवड करतेवेळी तसेच वाढीच्या अवस्थेमध्ये करावी. फॉस्परस करिता सिंगल सुपर फॉस्पेट या खताचा वापर करावा. पोटॅश हा घटकदेखील वाढीच्या सुरवातीपासून लागतो या प्रमाणे याचे नियोजन करावे. मायक्रोन्यूट्रियंट व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचाही संतुलित वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. फळाला छेद जाऊ नये म्हणून सुरवातीपासून कॅल्शियम व बोरॉन या दोन्ही अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करणे महत्त्वाचे असते.

    काढणीपश्चात व्यवस्थापन

    पक्व फळे काढल्यानंतर कोरोगेटेड बॉक्समध्ये फोमनेटच्या सहाय्याने पॅकिंग करून फळे विक्रीसाठी पाठविली जातात. प्रती वेल १.५ किलोपर्यंत फळे मिळतात. भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये पॉलीहाऊस मध्ये भारतीय पद्धतीने मातीमध्ये व डच पद्धतीने कोकोपीट यो बॅग्ज (हायड्रोपोनिक्स) या तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड करण्यात आलेली आहे.

    कोकोपीट मधील खरबूज लागवड

    कोकोपीट हे मुख्य माध्यम वापरूनदेखील  खरबूज  लागवड करता येते. कोकोपीट हे पूर्णतः निर्जतुकीकरण केलेले असावे यामध्ये कोणत्याही बक्टेरिया अथवा बुरशीचा प्रादुर्भाव नसावा. याचा सुरवातीचा विद्युत वाहकता (ईसी) साधारणतः १ ते १०ms/cm व सामू हा ५.५ ते ६.५ पर्यंत असावा. तसेच सोडियमचे प्रमाण ९  टक्क्यापेक्षा कमी असावे. कोकोपीट हे लगेच सुकत असल्यामुळे यामध्ये सुरवातीला थोड्या प्रमाणात वर्मीक्यूलाईट  या माध्यमाचा वापर करावा.

    पाणी व्यवस्थापन करत असताना प्रति दिन १ ते २ लिटर प्रति चौ. मी या प्रमाणात व्यवस्थापन करावे. प्रत्येक बॅगला पाणी निचरा व्यवस्था असावी. खत व्यवस्थापन हे अतिशय सूक्ष्म पद्धतीने करावे लागते. यामध्ये विद्युत वाहकता व सामुचा आधार घेऊन सर्व खतांचे मिश्रण तयार करून वापरणे गरजेचे असते. पाणी व खते यामध्ये २५ टक्के बचत होते. कोकोपीट मधील खरबूज पिक ८ ते १० दिवस लवकर तयार होते. पुन्हा तेच माध्यम वापरून आपण लागवड करू शकतो.

    कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पॉलीहाऊसमधील (हॅगींग) खरबूज लागवड केली जाते. पॉलीहाऊसमधून खरबुजाचे उत्पादन चांगले मिळते. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खरबुजाचे पीक घ्यावे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला गुणवत्ता केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन यशवंत जगदाळे (विषय विशेषज्ज्ञ उद्यानविद्या-भाजीपाला गुणवत्ता केंद्र) यांनी केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed