पार्किंग प्लाझा या जम्बो करोना रुग्णालयाचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. तर दिवा परिसरातील नव्या रुग्णालयाचे कामही सुरू होऊ शकले नाही. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावरील रुग्णांचा भार कमी करण्यासाठी शहरातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांच्या सक्षमीकरणाचे प्रयत्न सुरू असले तरी सिझेरिअन प्रसूतीसाठी आजही त्याच रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. मुंब्रा परिसरात रुग्णालयासाठी भव्य इमारत बांधून पूर्ण झाली असली तरी ती चालवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे ही वास्तू खासगी रुग्णालयांच्या हाती सोपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे करोनानंतरही ठाणे शहराची आरोग्यव्यवस्था अद्याप व्हेंटिलेटरवर असल्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमधून स्पष्ट होते.
‘ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार करोनासाठी ठाणे महापालिकेकडून पूर्ण तयारी करण्यात आली असून अत्यल्प काळात १२ खाटांचे पार्किंग प्लाझा जम्बो करोना रुग्णालय तात्काळ सुरू करता येऊ शकेल. रुग्णालय आणि त्यामधील मनुष्यबळही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने ठाणे शहरातील रुग्णांना येथील रुग्णालयात उपचारांची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे’, माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. मुंबई पालिकेच्या रुग्णालयात आलेल्या कोणत्याही रुग्णाला वैद्यकीय सेवा नाकारली जात नसल्याचे मुंबई पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी स्पष्ट केले.
काय सांगतो अभ्यास?
मुंबईमध्ये १ एप्रिल २०२० ते ३१ एप्रिल २०२२ या कालावधीत सेव्हन हिल्स रुग्णालयाने उपचार घेतलेल्या रुग्णांचा जो अभ्यास केला, त्यात ४२, ६८२ रुग्णांनी उपचार घेतल्याचे दिसून आले. त्यात ६०.८ टक्के पुरुष तर ३९.२ टक्के महिलांचा समावेश होता. सर्वाधिक म्हणजे ३,६९९ रुग्ण ठाण्यातील असून त्या खालाखोल पालघर (१,१९९), रायगड (६०२), नवी मुंबई (४६६), पुणे (२३५), रत्नागिरी (१७७), अहमदनगर (१०२), नाशिक (९८), सिंधुदुर्ग (९३) व कोल्हापूर (४८) येथील रुग्णांनी वैद्यकीय उपचार घेतले होते. पालिकाने नोंदवलेल्या एकूण मृत्यूपैकी ३७ मृत्यू हे इतर पालिका क्षेत्रांतील आहेत.