याबाबत अधिक माहिती अशी की, ३ एप्रिल ते ७ एप्रिल रोजी दुपारी दोन पर्यंत अवलारा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मीटिंग बाणेर येथे आयोजित करण्यात आली होती. या मीटिंगसाठी कंपनीच्या संपूर्ण भारतातील कामगार उपस्थित होते. शुक्रवारी दुपारी सात एप्रिल दुपारी तीनच्या सुमारास मीटिंग संपल्यानंतर कंपनीतील मुले व मुली यांचा ग्रुप पानशेत परिसरातील धिंडली (ता. वेल्हे) येथील आर्यावत रिसॉर्टवर कॅम्पिंगसाठी आला होता. मात्र सायंकाळी ५.३० वाजता सर्व जण रिसोर्टवर पोहचले.
रिसोर्ट फिरल्यानंतर अनशुल कमल अमेठा, वृषाली रामभाऊ गायधने, हरविंदरजित भुरसिंग सिंग, शबनम नरुद्दीन सिध्दीकी, मानसी संजयकुमार अगरवाल, मोहित हेमंत सराफ हे सर्वजण पानशेत धरणाचे बॅकवॅाटर पाहण्यासाठी पायी चालत गेले. धरणाच्या बॅंकवॅाटरच्या गुडघाभर पाण्यात सर्वजण गेले. यावेळी मोहीम सराफ याचा पाय घसरुन खोल पाण्यात त्याचा तोल गेला. त्यावेळी निखिल किशोर बडगुजर हा देखील यावेळी पाण्यात पडला.
परंतु जमिनीजवळ असलेल्या दगडाला धरुन तो वर आला. यानंतर मोहितला काढण्यासाठी सर्वजणांनी साखळी तयार केली. सर्वांनी मोहितला पाण्यातून वर काढण्याचा प्रयत्न करत असताना अनशुल अमेठा हा सर्वात पुढे होता. त्याचा देखील पाय घसरु लागल्याने सर्वजण घाबरुन पाण्याच्या बाहेर आले. सर्वांच्या डोळ्यादेखत मोहित पाण्यात बुडाला, मात्र कोणालाही पोहता येत नसल्याने त्याला कुणीही वाचवू शकले नाही. वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पानशेत पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार पंकज मोघे, राजाराम होले अधिक तपास करीत आहेत.