• Wed. Nov 13th, 2024

    सोलापूरच्या दैनंदिन सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने कार्यवाही करावी – पालकमंत्री विखे पाटील

    ByMH LIVE NEWS

    Apr 8, 2023
    सोलापूरच्या दैनंदिन सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने कार्यवाही करावी – पालकमंत्री विखे पाटील

    सोलापूर, दि. ८ (जिमाका) : सोलापूरला दैनंदिन सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या. तसेच, मंगळवेढा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ववत कार्यान्वित करण्यासाठी संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तातडीने मार्ग काढावा, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

    नियोजन भवन येथे आयोजित स्मार्ट सिटी व सोलापूर विकास आराखडा संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महावितरणचे श्री. सांगळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे श्री. देशपांडे आदी उपस्थित होते.

    या बैठकीदरम्यान आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याबाबत आवाहन केले. भोसे व अन्य ३९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, मंगळवेढा ही योजना फेब्रुवारी २०२० अखेर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होती. सद्या वीजबिल न भरल्यामुळे जून २०२१ पासून या योजनेतून पाणीपुरवठा होत नसून, संबंधित गावांना पाणी मिळणे गरजेचे असल्याचे आमदार आवताडे यांनी यावेळी सांगितले. यावर महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद आदी संबंधित यंत्रणांनी थकित वीज देयकप्रश्नी मार्ग काढावा, अशा सूचना यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

    शीतल तेली उगले यांनी स्मार्ट सिटीसंदर्भातील सादरीकरण केले. यामध्ये पूर्ण झालेल्या कामांचा तपशील, प्रगतीपथावर असलेल्या कामांचा तपशील, उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी, कामाची सद्यस्थिती यांची माहिती देण्यात आली.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed