डोंबिवली : ठाकुर्ली-कल्याण रेल्वे समांतर रोडवर रात्रीच्या सुमारास एका मद्यपी माथेफिरूने धिंगाणा घालून कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. चॉपर आणि दांडक्याच्या साह्याने रस्त्यावरील पादचाऱ्यांमध्ये दहशत माजविणाऱ्या या माथेफिरूने तेथील एका हॉटेल चालकासह त्याच्या मित्रावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. हल्लेखोराला टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पवन हनुमंत केणे (वय २८ वर्षे) असे या तरूणाचे नाव आहे. या संदर्भात तेथील हॉटेल चालक स्मित आनंद पाटील (वय ३२ वर्षे) याच्या जबानीवरून टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी मध्यरात्री १२.२० च्या सुमारास हा माथेफिरू तरूण डोंबिवली-कल्याण समांतर रोडला असलेल्या गावदेवी मंदिरासमोर दांडका हातात घेऊन या रस्त्याने ये-जा करणाऱ्या पुरूष आणि महिला पादचाऱ्यांना दहशत निर्माण करत होता. त्याने काही पादचाऱ्यांना मारहाणही केली. जवळपास अर्धा तास या तरुणाचा धिंगाणा रस्त्यावर सुरू होता.
हॉटेल चालक स्मित पाटील यांनी या तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मस्तकात भिनलेल्या दारूमुळे या माथेफिरूने हॉटेल चालक पाटील यांच्या डोक्यात बांबू हाणला. प्रतिकार केला असता माथेफिरू हल्लेखोराने त्याच्याकडील चॉपरने वार केला. हा वार चुकवल्याने हॉटेल चालक पाटील यांच्या तळहाताला जखम झाली. हे पाहून पाटील यांचा मित्र विशाल नाईक हा मध्ये पडला. त्यामुळे हल्लेखोर अधिकच बेफाम झाला.

त्याने चॉपरने केलेल्या हल्ल्यात विशाल याच्या पोटावर वार झाला. याच दरम्यान बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. कुणीतरी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांशीही हा माथेफिरू झटापट करत होता. अखेर पोलिसांनी या हल्लेखोराची गठडी वळली.
परिसरात दहशतीचे वातावरण
दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले. केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये हल्लेखोराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हा माथेफिरू कोण आहे ? कुठे राहतो ? त्याने यापूर्वी अशा पद्धतीने दहशत माजवली आहे का ? त्याच्यावर पोलिस ठाण्यांतून गुन्हे दाखल आहेत का ? याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.