• Mon. Nov 25th, 2024

    पाणीटंचाईत पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे – पालकमंत्री दादाजी भुसे

    ByMH LIVE NEWS

    Apr 8, 2023
    पाणीटंचाईत पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे – पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक ‍दि. ८ (जिमाका): अल निनोमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच त्याबाबत गावपातळीवर देखील सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पाणी टंचाईबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. बैठकीस नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उप वनसंरक्षक पंकज गर्ग, मालेगाव अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम गोसावी यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

    पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, पाणी टंचाईचे नियोजन करताना ग्रामपंचायत सदस्यांपासून खासदारांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून त्यांच्या माध्यमातून नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करण्यात यावे. त्याचप्रमाणे ज्या भागातील पाणी पुरवठा योजनांची कामे ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहेत, ती कामे तातडीने पूर्ण करावीत. जेणे करून पाणी टंचाई काळात त्या पाणी पुरवठा योजनांचा नागरिकांना उपयोग होईल. त्यासाठी प्रांताधिकारी यांनी संबंधित विभागांच्या स्थानिक पातळीवर बैठका घेवून आवश्यकेनुसार नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

    पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यासोबतच वनक्षेत्रातील प्राण्यांना गरजेनुसार पाणी उपलब्ध होईल याकडेही लक्ष देण्यात यावेत. त्याचप्रमाणे टंचाई काळात गावपातळीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जावून पाहणी करावी. तसेच नादुरूस्त बोअरवेलची कामे मिशन मोडवर घेवून तातडीने दुरूस्त करण्यात यावीत. पाण्याचा अपव्यव होणार नाही यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केल्यास त्याचा लाभ येणाऱ्या काळात होईल. पुरावठा विभागाने अन्नधान्याचे व पशुसंवर्धन विभागाने जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे. शिक्षण विभागाने येणाऱ्या काळातील उष्णतेची परिस्थिती लक्षात घेवून शाळांचा कालावधी व त्यांच्या वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच संभाव्य टंचाई काळात कमी पाऊस झाल्यास किंवा उशीराने पाऊस आल्यास त्याकाळात कोणती पिके घेणे फायदेशीर ठरेल त्‍याअनुषंगाने कृषी विभागाने आराखडा तयार करावा. वाढत्या उष्णतेचा आरोग्यावर होणारा विपरित परिणाम लक्षात घेवून संभाव्य आजारांच्याबाबत आरोग्य विभागाने सतर्कता बाळगून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे. संभाव्य निर्माण होणाऱ्या टंचाईकडे सकारात्मकपणे पाहून टिमवर्कने विकासात्मक कामे करण्यावर भर द्यावा असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *