• Mon. Nov 25th, 2024
    रिक्षात शाळेतली २० पोरं कोंबली, हटकलं तर हसतोय, अकोला पोलीस कारवाई करणार का?

    अकोला : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे वाहतूक नियमांचा पूर्णतः फज्जा उघडल्याचा. कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ऑटो रिक्षात तब्बल १५ ते २० विद्यार्थ्यांना कोंबून प्रवास सुरू असल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात असल्याचं स्पष्ट दिसतंय. या व्हिडिओ संदर्भात अधिक माहिती घेतली असता, अकोला शहरातील हा व्हिडिओ असल्याचं समजलं. आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा ऑटो रिक्षावर चालकांवर कारवाईची मागणी होत आहे. मात्र आरटीओ अधिकारी तसंच वाहतूक नियंत्रण शाखा याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. तरीही लवकरच शहरात अशा वाहनचालकांचे विरोधात मोहीम राबवणार असल्याचे पोलीस सांगतात.

    एका ऑटो रिक्षामध्ये ५ सीटर पेक्षा कमी प्रवासी वाहून न्यायचा परवाना असतोय. तरीही अशा परिस्थितीत ऑटो चालक जीव धोक्यात घालून समोर चार ते पाच विद्यार्थी बसवून तसेच काही विद्यार्थी उभे ठेवून म्हणजेच लटकून प्रवास करताना दिसून येतात. अकोल्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ हेच सांगून जातोय. या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवासी प्रवास करत असल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आलं आहे. या ऑटो रिक्षामध्ये तब्बल १५ ते २० शालेय विद्यार्थी असल्याचे समजते. तरीही व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने यासंदर्भात ऑटो चालकाला हटकले असता त्याने त्यावर स्माईल केली आणि विषय सोडून दिला. शालेय विद्यार्थ्यांकडून मात्र आम्ही ३५ विद्यार्थी आहोत, असे सांगण्यात आलं. या व्हिडिओमध्ये मात्र पंधराच्या जवळपास विद्यार्थी असल्याचं दिसून येत आहे.

    ऑटो रिक्षा, स्कुल बससह छोट्या-मोठ्या कारमधून विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याचे प्रमाण आता वाढले आहे. याचाच फायदा घेत अकोला शहरात अनेक ठिकाणी ऑटो रिक्षा चालक बेकायदा शालेय विद्यार्थी वाहतूक करीत आहे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक रिक्षामधून होत असल्याने हा प्रवास जीवघेणा ठरतोय. त्यात वायरल होत असलेल्या व्हिडिओद्वारे स्पष्टच समजते की शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे अशी वाहतूक करणाऱ्यांकडून अनेकदा सुरक्षिततेविषयक खबरदारी घेतली जात नाही. यामुळे अनेकदा अपघातही घडले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *