हा महामोर्चा मुंबईतील भायखळा येथील मुंबईतील वीर जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत काढण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
बुधवारी यासंदर्भातील पत्रकार परिषद पार पडली. समस्त ख्रिस्ती समाजाच्यावतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ख्रिस्ती समुदायाच्या प्रार्थनांमध्ये व्यत्यय आणला जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे ख्रिश्चन व्यक्तींच्या, संस्थांच्या मालमत्तांची देखील हानी केली जातेय, या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी १२ एप्रिल रोजी महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महा मोर्चामध्ये सामाजिक कार्यकर्ते डॉल्फी डिसुझा, राम पुनियानी, अॅड. लारा जेसानी, शिरील दारा, देवधन त्रिभुवन, पॉल जोसेफ आणि जितूभाई राठोड यांचा देखील सहभाग असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
नवी दिल्लीतील यूनाएटेड ख्रिश्चन फोरम यांच्याकडून टोल फ्री क्रमांकाद्वारे ख्रिस्ती समुदायाविरोधात घडणाऱ्या अन्यायाच्या घटनांची माहिती घेत असते. गेल्या वर्षभरात देशातील २१ राज्यांमध्ये ५९७ घटना घडल्याची माहिती डॉल्फी डिसुझा यांनी दिली.
ख्रिश्चन समुदायाविरोधात राबवल्या जाणाऱ्या द्वेषपूर्ण मोहिमा थांबवण्यात याव्यात,राजकीय नेत्यांची ख्रिश्चन समुदायाविरोधातील द्वेषपूर्ण भाषण थांबवली जावीत. सध्याच्या कायद्यात पुरेशा तरतुदी असताना धर्मांतर विरोधी कायदा राबवला जाऊ नये, या मागण्यांसह ख्रिश्चन समुदायाविरोधात होत असलेल्या घटनांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न मोर्चा द्वारे करण्यात येणार आहे.
समस्त ख्रिस्ती समाजाकडून १२ एप्रिल रोजी महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महामोर्चा शांततामय मार्गानं होणार असून मुंबईसह महाराष्ट्रातील ख्रिश्चन बांधवांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.