या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद झाला होता. याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु होता. सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा व महिलेविरुद्ध असल्याने तात्काळ तो उघडकीस आणण्याबाबत तपास पथकावर दबावही होताच. या तपासकामी स्वतंत्र पाच पथके तयार करण्यात आली होती. घटनास्थळ परिसरातील सलग तीन दिवसाच्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून संशयित वाहनांच्या नोंदी घेऊन त्यांची छाननी करण्यात आली. त्यात एका रिक्षामधून एक महिला व रिक्षा चालक असे घटनास्थळी जात असल्याचे दिसून आले.
सदर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मागोवा घेऊन संबधीत ऑटो रिक्षाचा नंबर पोलिसांनी प्राप्त केला. त्याचा शोध घेतला असता ही रिक्षा मोहम्मद अहमद मोहम्मद अली राईन (वय ३६ वर्ष, रा. शिळफाटा ठाणे ) याची असल्याचे समोर आले. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांना आरोपीने दिलेल्या माहितीनुसार तुर्भे इंदिरा नगर परिसरातून प्रवासी शोधत असताना सदर महिला प्रवासी म्हणून आरोपीच्या रिक्षात बसली. पुढे अडवली भुतवली परिसरातील निर्जन ठिकाणी आल्यावर महिलेसोबत आरोपीने शरीरसंबंध ठेवले. त्या मोबदल्यात तिने आरोपीकडे एक हजार रुपयांची मागणी केली. परंतु रक्कम देण्यास आरोपीने नकार देताच त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादामध्ये आरोपीने महिलेला ढकलून खाली पाडले व शेजारीच पडलेली एक सिमेंटची वीट तिच्या डोक्यात घालून तिला जीवे ठार मारले.
ठाण्यातील राड्यानंतर रोशनी शिंदे यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल
आरोपीवर सुरुवातीला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र त्याने दिलेल्या कबुलीनंतर बलात्काराचाही गुन्हा त्याच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. आरोपीने माहिती दिली असली तरी गुन्ह्याचा तपास थांबलेला नाही. तसेच अद्याप मयत महिलेची ओळख पटलेली नाही. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.