• Mon. Nov 25th, 2024

    चित्ता पोहोचला गावाजवळ, शेतात भटकत असल्याचा दावा; कुनो उद्यानात आणण्याचे प्रयत्न सुरू

    चित्ता पोहोचला गावाजवळ, शेतात भटकत असल्याचा दावा; कुनो उद्यानात आणण्याचे प्रयत्न सुरू

    वृत्तसंस्था, श्योपूर (मध्य प्रदेश): कुनो राष्ट्रीय उद्यानातील मुक्त संचार क्षेत्रात सोडण्यात आलेल्या चित्त्यांपैकी एक चित्ता या क्षेत्रातून बाहेर पडून गावाजवळील शेतात पोहोचल्याची घटना उघडकीस आली आहे. या चित्त्याला मुक्त संचार क्षेत्रात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या या वेगळ्या वर्तनाबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.गावकऱ्यांना ‘दर्शन’

    मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानाजवळील (केएनपी) गावात शेतात एक चित्ता फिरताना दिसल्याची घटना रविवारी सकाळी घडल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांपैकी ओबान हा चित्ता ‘केएनपी’पासून १५ ते २० किलोमीटर अंतरावरील बडोदा गावाजवळील शेतात भटकत होता. गेल्या महिन्यात त्याला उद्यानाच्या मुक्त संचार क्षेत्रात सोडण्यात आले होते,’ असे श्योपूर विभागीय वन अधिकारी पी. के. वर्मा यांनी ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला सांगितले.

    कॉलर डिव्हाइस

    आठही चित्त्यांना कॉलर डिव्हाइस लावण्यात आले आहेत. ‘ओबान’च्या कॉलर डिव्हाइसमधून मिळालेल्या सिग्नलनुसार, शनिवारी रात्रीपासून चित्ता गावाच्या दिशेने निघाला होता. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांचे पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गावकऱ्यांना चित्त्यापासून दूर ठेवले जात आहे. वनविभागाचे कर्मचारी ओबानला उद्यान परिसरात परत पाठवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वर्मा यांनी सांगितले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. यात वन विभागाचे कर्मचारी ‘ओबान’ला जंगलात परत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहेत.

    नामिबियातून आणले चित्ते

    सप्टेंबर २०२२मध्ये नामिबियातून ‘केएनपी’मध्ये आणलेले आठपैकी चार चित्ते आतापर्यंत जंगलात सोडण्यात आले आहेत. ओबान आणि आशा यांना ११ मार्च रोजी जंगलात सोडण्यात आले. ‘रॉकस्टार’ म्हणून ओळखले जाणारे एल्टन आणि फ्रेडी यांना २२ मार्च रोजी जंगलात जाण्याची परवानगी देण्यात आली. आठ नामिबियन चित्त्यांमध्ये पाच माद्या आणि तीन नरांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी त्यांना विशेष बंदोबस्तात सोडण्यात आले. त्यापैकी एक असलेल्या ‘साशा’चा २७ मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला. दुसऱ्या ‘सियाया’ने चार पिल्लांना जन्म दिला. २९ मार्च रोजी त्यांचे प्रथम दर्शन घडले. या वर्षी १८ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून सात नर आणि पाच माद्या असे एकूण १२ चित्ते आणण्यात आले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *