• Mon. Nov 25th, 2024

    शिर्डीच्या साईबाबांविषयी बागेश्वर बाबा काहीबाही बोलला, जितेंद्र आव्हाड संतापून म्हणाले…

    शिर्डीच्या साईबाबांविषयी बागेश्वर बाबा काहीबाही बोलला, जितेंद्र आव्हाड संतापून म्हणाले…

    मुंबई: महाराष्ट्रातील कोणताही महापुरुष किंवा श्रद्धास्थानांना येऊन शिव्या घातल्या तरी तुमच्यावर कारवाई होणार नाही. या वातावरणाचा फायदा उठवा, काहीही बोललात तरी तुमच्यावर कारवाई होणार नाही, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. कालीचरण बाबा आणि बागेश्वर बाबा यांनी नुकतीच काही वादग्रस्त वक्तव्यं केली होती. यापैकी कालीचरण बाबा यांनी नथुराम गोडसेने महात्मा गांधींना मारून योग्यच केले, असे वक्तव्य कोल्हापूर येथे केले होते. तर बागेश्वर धामचे प्रमुख असलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. साईबाबा हे देव नाहीत, ते फार तर फकीर किंवा संत असू शकतात. शंकराचार्यांच्या आदेशानुसार मी त्यांना कदापि देव मानणार नाही, असे बागेश्वर बाबाने म्हटले होते.

    गिधड की खाल पहनकर कोई शेर नही हो सकता; बागेश्वर बाबांचं शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य

    या सगळ्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपली उद्विग्नता व्यक्त केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कालिचरण महात्मा गांधींबद्दल काय वाटेल ते बोलतो, बागेश्वर साईबाबांचा अपमान करतो काय वाट्टेल ते बोलतो. महाराष्ट्रातली प्रजा सोशिक आहे त्यांना राग येत नाही ,सरकार नपुंसक. कोणीही या काहीही बोला, कुणालाही बोला, सरकार काही करणार नाही. जाहीर आमंत्रण! या… महाराष्ट्रात कोणालाही शिव्या द्या. छत्रपती शिवाजी महाराजांना द्या… जिजाऊ मातेला द्या, महात्मा गांधींना द्या… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना द्या…महात्मा फुलेंना द्या… क्रांतीज्योती सावित्री माईला द्या, छत्रपती शाहू महाराजांना द्या… साईबाबांना द्या… यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही याची खात्री आणि शाश्वती आहे. या लवकर या. कुणालाही शिव्या घाला महापुरुषांना घाला, श्रद्धा स्थानांना घाला, असे वातावरण परत मिळणार नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

    शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य, विखे-पाटलांकडून बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

    कालिचरण महाराज आणि बागेश्वर बाबाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात गदारोळ सुरु आहे. बागेश्वर बाबांचे शिर्डीच्या साईंविषयीचे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्याचे सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटले आहेत. आतापर्यंत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बागेश्वर बाबाला फटकारले आहे. बागेश्वर बाबासारखे लोक समाजात तेढ निर्माण करतात. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मत राधाकृष्म विखे-पाटील यांनी व्यक्त केले होते. तर रोहित पवार यांनी या प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप केले होते. बागेश्वर बाबाचा बोलविता धनी वेगळाच असून त्यांच्या माध्यमातून भाजप आपला छुपा अजेंडा रेटत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भाजपने साईबाबांविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *