मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तेली आळी येथे राहणारे अनिल भार्गव पोटफोडे (५७) यांची राम आळी येथे गेली कित्येक वर्षे पीठ व मसाला गिरणी आहे. शनिवारी सायंकाळी गिरणीमध्ये काम सुरू असताना अचानक गिरणीच्या बेल्टमध्ये पाय अडकून ते मशीनमध्ये खेचले गेले. त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली होती.
त्यांना तातडीने परिसरातील व्यावसायिकांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले. मात्र कोल्हापूर येथे उपचारांदरम्यान रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
पिढीजात पिठगिरणीचा व्यवसाय करणारे श्रीराम मंदिर देवस्थानचे मानकरी व अत्यंत प्रेमळ स्वभावाचे म्हणून ते सगळ्यांना परिचित होते. सर्वांच्या मदतीला धावून जाणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून रत्नागिरी शहर बाजारपेठेवर शोककळा पसरली आहे.
गिरणीवाले काका म्हणून सुपरिचित…
परिसरात ते गिरणवाले काका म्हणून ओळखत जात होते. कधी कुणाकडे पैसे नसतील तर त्यांनी कधी पैशाचा आग्रह धरला नाही. गोरगरिबांना ते नेहमी मदत करायचे. परोपकाराचा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या गिरणीचा फायदा आजवर अनेक शेतकरी, महिला यांना होत आला आहे. त्यामुळे त्यांचा ग्रामीण भागात अतिशय चांगला संपर्क होता. या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने रत्नागिरी शहर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.