• Mon. Nov 25th, 2024
    कितीही प्रयत्न करा, वर्षभरात विस्तारीकरण करणारच, महाडिकांचं बंटी पाटलांना चॅलेंज

    म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : गगनबावड्यातील डी. वाय. पाटील कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम ज्यांनी केले, तेच आज शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे ढोंग करत आहेत. कुणीही कितीही विरोध केला तरी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा विस्तार होणारच, असा विश्वास माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.

    श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात महाडिक बोलत होते. ते म्हणाले, आजतागायत कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध करणारी मंडळीच आज विस्तारीकरणाबाबत आम्हाला विचारणा करत आहेत. या गोष्टी सभासद शेतकरी जाणून आहे. वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये यांनी विस्तारीकरणाला केलेला विरोध सर्व सभासदांनी पाहिलेला आहे. इथून पुढे कोणी कितीही विरोध केला तरी कारखान्याचे विस्तारीकरण हे होणारच !

    “गगनबावड्यातील डी.वाय. पाटील कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम ज्यांनी केले, तेच आज शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे ढोंग करत आहेत. पण यांची लबाडी राजारामचा सुज्ञ शेतकरी सभासद चांगलाच ओळखून आहे. त्यामुळेच त्यांची पोळी इथे भाजली जाणार नाही, याची खात्री आता विरोधकांनाही पटलेली आहे”, असंही ते म्हणाले.

    पोटनियमांचे उल्लंघन केलेल्या २९ उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले. त्यामुळे सत्य परिस्थिती आणि नियमानुसार झालेली कारवाई पाहता त्यांनी या निर्णयाचा आदर करणे अपेक्षित होते. असे न करता निवडणुकीसाठी आता काहीच मुद्दा शिल्लक नसल्याने काही लोक विनाकारण या मुद्द्याला कवटाळून राजकारण करत आहेत, असा आरोप माजी चेअरमन दिलीप पाटील यांनी केला.

    पाटील म्हणाले, विरोधकांकडून कारखाना प्रशासनाकडे रंजना अशोक पाटील व अशोक उमराव पाटील अश्या २ व्यक्तींचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यांच्या अर्जानुसार त्यांना माहिती देण्यात आली. इतर कोणाचाही अर्ज काल आला नव्हता. पण विरोधकांनी मात्र अर्ज देऊनही माहिती दिली नाही अश्या प्रकारे धादांत खोटा आरोप केला. त्यातही काल दुपारनंतर रामनवमीची सुट्टी असल्या कारणाने कारखाना कार्यस्थळावर अधिकारी उपस्थित नव्हते. नेमकी हीच संधी साधून संध्याकाळी विरोधकांनी जाणूनबुजून कारखाना कार्यस्थळावर गोंधळ घातला.

    काल त्यांनी जी काही स्टंटबाजी केली आणि खोटं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये काही तथ्य नाही. निवडणुकीची सर्व प्रक्रिया कारखाना प्रशासन आणि शासकीय यंत्रणा अतिशय पारदर्शकपणे आणि लोकशाही पद्धतीने पार पाडत आहेत, जर कोणी विनाकारण कारखाना कार्यस्थळावर गोंधळ घालणे किंवा प्रशासनास वेठीस धरून बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडूनही जश्यास तसेच उत्तर दिले जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.

    यावेळी बटूसिंग रजपूत, रघुनाथ पाटील, पांडबा यादव, संभाजीराव पाटील, हंबीरराव वळके, बी.आर.शिंदे, केवलसिंग रजपूत, यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed