• Sat. Sep 21st, 2024
रामाच्या नावाने दंगली पेटवून निवडणुका जिंकण्याचा डाव, सामनातून एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

मुंबई: रामाच्या नावाने दंगा करणाऱ्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. दंगलबाज टोळयांना हवा देऊन महाराष्ट्रातील शहरं आणि गावं जाळली जात आहेत. डॉ. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, पण राज्य अनेक बाबतीत अधोगतीस जात आहे. लोकांचा त्यांना भोपळयाइतकाही पाठिंबा नाही. त्यामुळे दंगलींचा आधार घेऊन ते स्वतःला हिंदुत्वाचे पुरस्कर्ते मानून घेत आहेत, अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहत आहे. सर्वकाही शांततेत सुरु असताना पुन्हा रामाच्या नावाने हिंसा घडवणे हे षडयंत्र आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी रामाच्या नावाने दंगलींचा आगडोंब पेटवून त्या आगीवर पुन्हा नकली हिंदुत्त्वाची भाकरी शेकण्याची दळभद्री योजना आहे. देश लुटणाऱ्या अदानी भ्रष्टाचारावरचे लक्ष उडून जावे व दंगलीचा उन्माद माजवून लोकांनी धर्माची भांग पिऊन गप्प पडावे व त्याच भांगेच्या नशेत मतदान करावे, असे हे कारस्थान आहे. रामनवमीच्या निमित्ताने घडलेला प्रकार हे ‘रामनाम सत्य’ नसून रामाची बदनामी आहे. राम हा जीवनाचा हिस्सा आहे. जीवनाचा हा हिस्सा असा हिंसक होऊन कसा चालेल? पण देशात तेच चालले आहे, अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

शेवटी लेकीचं काळीज ते! पोलीस बाबा दंगलीतून सुखरुप घरी परतले, मुलीने हंबरडा फोडत मारली मिठी

रामनवमी आणि तलवारीचा संबंध काय?

मर्यादापुरुषोत्तम, संयमी, एकवचनी, सत्यवचनी म्हणून श्रीरामाची कीर्ती आहे. त्या रामाच्या जन्मदिनी त्याचे भक्त म्हणवून घेणारे हिंसा करतात. इतरांच्या प्रार्थनास्थळांवर दगडफेक करतात, हे चित्र जगातल्या चौथ्या की पाचव्या आर्थिक महासत्तेस शोभा देणारे नाही. उलट देशाची ‘शोभा’ करणारेच हे प्रकार आहेत. छत्रपती संभाजीनगरात शहराच्या नामांतराची सूचना निघाल्यापासूनच पेटवापेटवीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, दंगलीमागच्या डोक्यांनी मुहूर्त साधला तो श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येचाच दोन गटांतील वादानंतर मुस्लिमांच्या जमावाने राममंदिरासमोरच धुमाकूळ घातला. पोलिसांची वाहने जाळली. राममंदिराजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, पण हे असे अचानक का घडले? की सर्व काही पूर्वनियोजित व ठरल्याप्रमाणे घडले? अनेक शोभायात्रांत बेफाम पोरांनी नंग्या तलवारी नाचवल्या व धार्मिक उन्मादाची झलक दाखवली. रामनवमी आणि तलवारीचा संबंध काय? तलवार ही रामायण काळात नव्हती.भवानी मातेची, शिवरायांची. मग रामनवमीच्या शोभायात्रेत नंग्या तलवारी नाचवण्याचे प्रयोजन काय?, असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

Shinde Camp: शिंदे गटातील ४० पैकी २८ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

दंगली आत्ताच का सुरु झाल्या?

हाताला काम नसलेल्यांना दंगली घडविण्याचे काम देणारी राजकीय फॅक्टरी गेल्या सात-आठ वर्षांपासून देशात सुरू झाली आहे व प्रभू श्रीरामांच्या नावाने दंगली घडवून वातावरण पेटवा अशी योजना आहे. हे विधान आम्ही अत्यंत जबाबदारीने करीत आहोत. आठ दिवसांपूर्वीच मुंबईसह महाराष्ट्रात हिंदू नववर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा, रथयात्रा निघाल्या. त्या शोभायात्रा मुसलमानांच्या मोहल्ल्यांतूनही गेल्या. त्या शोभायात्रांवर कोणी दगड मारले नाहीत व त्या शोभायात्रेत सहभागी झालेल्यांनी मशिदीवर पेट्रोल बॉम्ब फेकले नाहीत. मग हे सर्व पुढच्या आठ दिवसांनी आलेल्या रामनवमीच्या शोभायात्रेतच का घडले? हा संशोधनाचा विषय आहे. गुजरात व महाराष्ट्रात भाजपचे राज्य आहे, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed