• Mon. Nov 25th, 2024

    संभाजीनगरमधील सभेला अखेर हिरवा कंदील; महाविकासआघाडीकडून शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न

    संभाजीनगरमधील सभेला अखेर हिरवा कंदील; महाविकासआघाडीकडून  शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची जाहीर सभा येत्या दोन एप्रिल रोजी खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत आहे. सभेसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी केली जात असतानाच शहरातील किराडपुरा भागात घडलेल्या घटनेमुळे या सभेला परवानगी मिळणार की नाही अशा चर्चा सुरू होती. अखेर पोलिस प्रशासनाने या सभेला सशर्त परवानगी दिली आहे.या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आघाडीचे नेते, पदाधिकारी उपस्थित असणार आहे.

    दरम्यान, या सभेला सायंकाळी पाच ते रात्री पावणेदहापर्यंत परवानगी देण्यात आल्याचे पत्र पोलिसांनी आयोजन समितीला दिले आहे. कार्यक्रमाच्या वेळेत व ठिकाणात कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, कार्यक्रमाचे वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये व वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी, सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी. सभास्थानी कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये, यासह अन्य अटीवर सभेला पोलिसांनी परवानगी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

    छ. संभाजीनगरच्या सभेला पोलिसांकडून परवानगी, पण भाजपने आमच्या सभेचा धसका घेतला; अंबादास दानवेंनी ऐकवलं

    दंगल भाजप पुरस्कृत

    मुंबई : संभाजीनगरमध्ये येत्या २ तारखेला महाविकास आघाडीची सभा होणार असून, ही सभा होऊ नये म्हणूच संभाजीनगरात तणाव निर्माण करण्यात आला आहे. संभाजीनगरसह देशात ज्या दंगली झाल्या त्या भाजप पुरस्कृत होत्या, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची शेवटची धडपड सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

    संभाजीनगरात दोन्ही धर्मांच्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळे संभाजीनगरात मोठी दंगल झाली नाही. येत्या दोन एप्रिलला रोजी महाविकास आघाडीची संभाजीनगरात सभा आहे. ती होऊ नये, कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली सभा होऊ नये, त्यासाठी कारस्थान सुरू आहे. काल मुंबईतही मालवणीतही दोन गटात तणाव झाला. यापूर्वी रामनवमी होत होती. गुढी पाडवा होत होता. पण खेड, मालेगावमध्ये आमच्या सभेला लोकांचा जो प्रतिसाद मिळत आहे. ते पाहिल्यावर काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कारण नसताना जातीय धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. हा त्यांच्या नपुंसकतेचा पुरावा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. राज्यात दंगली घडवल्या जात आहेत. दंगली घडवणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही; पण काहीही केले तरी आमची सभा होणारच. महाविकास आघाडीचे नेते या सभेला हजर राहतीलच असे राऊत यांनी स्पष्ट केले.

    विरोधकांवर खोट्या कारवाया करणे, जुनी प्रकरणं काढून गुन्हे दाखल करणे सुरू आहे. या राज्यात असे कधीही झाले नव्हते. मात्र, लक्षात ठेवा डाव उलटा पडला तर उद्या आम्ही सत्तेवर येऊ. तेव्हा तुम्हाला याची उत्तरे द्यावी लागतील. खासकरून पोलिसांना, असा इशाराही राऊत यांनी दिला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात दंगल झाली नाही. तेव्हाही रामनवमी होतीच ना. तुमच्याच राज्यात दंगल का होते? कारण तुम्ही काही लोकांना दंगलीसाठी पुरस्कृत करीत आहात. समाजात तेढ निर्माण केली जात आहे. त्यांना शांतता नको आहे. उद्धव ठाकरेंना मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांना भविष्य दिसत आहे, त्यासाठीच त्यांची शेवटची धडपड सुरू आहे, असा टोलाही त्यांनी चढवला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed