म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईसह राज्यात तापाचा जोर वाढत असताना काही रुग्णांमध्ये करोना आणि इन्फ्लुएन्झा अशी संमिश्र लक्षणे दिसत आहेत. मात्र या दोन्ही आजारांच्या निश्चित निदानासाठी शरीरातील ऑक्सिजनची पातळी हा निकष निर्धारित करण्यात आला आहे.करोना संसर्गामुळे अनेक रुग्णांमध्ये पहिल्या टप्प्यात ऑक्सिजनची पातळी कमी होते व त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणे, तापाचा जोर वाढणे तसेच सर्दी, खोकला या लक्षणांची तीव्रता अधिक असते. मात्र इन्फ्लुएन्झाच्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी लगेच कमी होत नाही; याउलट सर्दी-खोकला, तीव्र स्वरूपाची घसादुखी आणि त्यानंतर न्यूमोनियाचा संसर्ग अशी लक्षणे काही रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. त्यामुळे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी उपचारपद्धतीची दिशा ठरवताना रुग्णांची ऑक्सिजनची पातळी किती हे पाहिले जाते. ‘करोना संसर्गाच्या लक्षणांमध्ये फुफ्फुसांमध्ये होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने आजार बळावत नाही व रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याचे प्रमाण कमी असते’, अशी माहिती संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. अतुल वेल्हे यांनी दिली.
४२५ नवे करोना रुग्णराज्यात शुक्रवारी ४२५ नव्या रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ३०९०वर पोहोचली आहे. शुक्रवारी एकाही करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यातील मृत्यू दर १.८२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९.४० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले असून, मुंबईत आत्तापर्यंत ९३७ उपचाराधीन रुग्णांची नोंद झाली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या मुंबईत सर्वाधिक आहे. त्याखालोखाल पुणे येथे ७२६ तर ठाण्यात ५६६ उपचाराधीन रुग्ण आहेत.