या बाबत पोलिसांनी सांगितले की, झारखंड राज्यातील गिरिडोह जिल्हयातील बजटो गावातील रहिवासी अजय सिंह सुतार म्हणून काम करण्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथे आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी रात्री तो हावडा मेलने गावी जाण्यासाठी निघाला होता. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १७ वरुन रात्री सव्वा दहाची मेल सुटली. सामान्य डब्यातून अजय प्रवास करत होता. मेल सुटून पुन्हा रेल्वे स्थानका बाहेर थांबली. त्यावेळी एअरफोन विकणारे दोन फेरीवाले आणि त्यांचा एक साथीदार डब्यात चढले. अजय यांच्या शेजारील एका प्रवाशाने ५०० रुपयांची नोट देऊन दीडशे रुपयांना फोन खरेदी केला. फेरीवाल्याने परत कलेले उर्वरित ३०० रुपये खरेदीदाराच्या हातात होते. ५० रुपये नंतर देतो असे फेरीवाला म्हणाला. त्याचवेळी तेथे दुसरा एक व्यक्ती आला. त्याने खरेदीदाराला ‘तु कोणाचे पैसे चोरलेस. तुझ्या हातामधील पैसे कोणाचे आहेत,’ असा प्रश्न करुन त्याला चोर समजून दटावणी केली. अजयने दटावणी करणाऱ्याला त्याने एअरफोन खरेदी केला आहे. ५०० रुपयांमधून जी रक्कम परत मिळाली त्यामधील रक्कम त्याच्या हातात आहे असे सांगितले. त्यावेळी त्या व्यक्तीनं अजयला ‘तु मध्ये बोलू नकोस. तुला आम्ही बघतो’ अशी धमकी दिली.
मेल सुरू झाल्यानंतर एअरफोन विकणारे दोन जण अजयच्या जवळ आले. त्यांन अजयला हिरो समजतोस का,असं बोलून शिवीगाळ, दगड खडीने मारहाण सुरू केली. त्यांना आणखी एका व्यक्तीनं साथ दिली. तिघांनी अजयला मारहाण करत त्याच्या खिशातील दोन हजार पाचशे रुपयांची रक्कम काढून घेतली. हा प्रकार सुरू असतानाच पुन्हा मेल सीएसएमटी-मशीद स्थानकांच्या दरम्यान थांबली. या संधीचा गैरफायदा घेत तिन्ही चोरटे पळून गेले.
अजयने तात्काळ रेल्वेच्या मदत संपर्क क्रमांकावर संपर्क केला. तात्काळ रेल्वे सुरक्षा यंत्रणा जागी झाली. कल्याण रेल्वे स्थानकात सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजता हावडा मेल येताच, रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी अजयला मेलमधून उतरविले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्याच्या तक्रारीवरुन तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.