• Sat. Sep 21st, 2024

पक्का पुणेकर ते मुरलेला राजकारणी; सर्वपक्षीय नेते अन् कार्यकर्त्यांशी बापट यांचा अनोखा दोस्ताना

पक्का पुणेकर ते मुरलेला राजकारणी; सर्वपक्षीय नेते अन् कार्यकर्त्यांशी बापट यांचा अनोखा दोस्ताना

म. टा. प्रतिनिधी, पुणे : जवळपास प्रत्येक क्षेत्रातील पुणेकरांकडे खासदार गिरीश बापट यांच्या संदर्भातील अशी एखादी तरी आठवण नक्कीच आहे. राजकारण-समाजकारणच नव्हे; तर कला-क्रीडा-शिक्षण अशा सार्वजनिक जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये गेली पाच दशके बापट यांचा सक्रिय संचार होता. मूळ अमरावतीचे असले, तरी कसबा-शनिवार आणि नारायण पेठेत वाढलेला ‘पक्का पुणेकर’ हीच बापट यांची ओळख होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले बापट अण्णा जोशी, अरविंद लेले, शिवाजीराव आढाव अशा जुन्या पिढीतील नेत्यांचे बोट धरून शहराच्या राजकारणात उतरले. एकारलेपणा त्यांच्या रक्तातच नव्हता, त्यामुळेच सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांशी असलेला दोस्ताना त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात फायदेशीर ठरला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचीही उंची त्यामुळे वाढली. बहुमत पाठीशी नसताना महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये अध्यक्षपद मिळवून बापट यांनी त्याचीच झलक दाखवून दिली होती.

पुढे अण्णा जोशी खासदार झाल्यानंतर कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत बापट यांना वसंत थोरात यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. निकालानंतर थोरात यांचे हार घालून अभिनंदन केल्यावर घरी येताच देव्हाऱ्यापुढे त्यांनी पुढील निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढविला आणि मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात माणसे जोडून सलग पाच वेळा कसबा पेठेचा बालेकिल्ला अभेद्य ठेवला. फेररचनेनंतरही पारंपरिकदृष्ट्या भाजपला अनुकूल नसलेल्या या मतदारसंघात निरनिराळ्या राजकीय क्लृप्त्या लढवित आणि विविध क्षेत्रातील लोकसंपर्काच्या बळावर ते विजयाची पुनरावृत्ती करीत राहिले. कसबा पेठेत नुकताच भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला, त्यामध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रचारात सहभागी न झालेल्या बापट यांची उणीव अनेकांना जाणवली.

पुढील पिढीमध्ये प्रदीप रावत, बापट, विजय काळे यांच्याकडे शहरातील पक्षाची सूत्रे आली. रावत खासदार झाले, काळे आमदार झाले, बापट मंत्री आणि नंतर खासदारही झाले. दरम्यान, राज्यातही प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांचे वर्चस्व होते. त्या काळात पुण्यातही अनेकजण या नेत्यांचे समर्थक होते. मात्र, सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवतानाच यापैकी कोणाच्याही गोटात थेट सामील होण्याचे नाकारून स्वत:चा राजकीय मार्ग निवडला, हे बापट यांचे वैशिष्ट्य. इतकेच नव्हे, तर पुण्यात बापट यांच्या समर्थकांचा स्वतंत्र मोठा गटही उभा राहिला.

‘हेडमास्तर’ झाले अन् ‘शाळा’ही घेतली

राजकीय वजन वापरून आपल्याशी निष्ठावान कार्यकर्त्याला निवडणुकीत उमेदवारी किंवा संघटनेत काही ना काही मार्गाने स्थान त्यांनी मिळवून दिले; तसेच विरोधकांना नामोहरमही केले. मात्र, १९९५नंतर बापट यांना वगळून भाजपचे पुण्याचे राजकारण झाले नाही, असे निरीक्षक सांगतात. शहर भाजपमध्ये नंतर नेतृत्वाची पुढील पिढी आली. केंद्रापासून महापालिकेपर्यंत सत्ता आली आणि नव्या पिढीतील अनेकजण पदाधिकारी झाले. मात्र, त्या गर्दीतही बापट यांनी आपला वचक कायम ठेवला होता. त्यामुळेच पक्षाच्या वर्तुळात त्यांना ‘हेडमास्तर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेक बैठकांमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांची ‘शाळा’ घेतल्याचे किस्से सर्वश्रुत आहेत.

राजकारणापलीकडे त्यांची माणुसकी होती; गिरीश बापट यांच्या निधनानं रवींद्र धंगेकरांच्या डोळ्यात पाणी

विरोधी पक्षातही तगडा जनसंपर्क

शहराच्या कोणत्याही भागातील कार्यकर्त्यांशी थेट वैयक्तिक संपर्क, ही बापट यांची खासियत होती. प्रत्येकाच्या वैयक्तिक सुखदु:खांच्या प्रसंगी त्यांची आवर्जून उपस्थिती आहे. तेच त्यांचे बलस्थानही ठरले. सर्वसामान्यांत मिसळल्याने नागरिकांच्या प्रश्नांची त्यांना नेमकी जाण होती. त्याबरोबरच शहराच्या कानाकोपऱ्यात राजकीय-सामाजिक जीवनात ‘खुट्ट’ झाले, तरी बापट यांच्यापर्यंत विद्युत वेगाने ही माहिती पोहोचत असे. अनेकदा विरोधी पक्षातील नेते-कार्यकर्तेही त्यांना ‘सक्रिय’ मदत करीत, असेही सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed