• Mon. Nov 25th, 2024

    नामिबियाच्या चित्त्याची गोड बातमी! भारतीय चित्त्यांची पहिली पिढी अवतरली, आले नवे पाहुणे

    नामिबियाच्या चित्त्याची गोड बातमी! भारतीय चित्त्यांची पहिली पिढी अवतरली, आले नवे पाहुणे

    वृत्तसंस्था, शेवपूर/भोपाळ : आफ्रिका खंडातील नामिबियातून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित करण्यात आलेल्या चित्त्याच्या मादीने चार बछड्यांना जन्म दिल्याची शुभवार्ता वनाधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. या उद्यानातील अन्य एका मादी चित्त्याचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाल्यानंतर, दोन दिवसांतच या नव्या पाहुण्यांच्या आगमनाची गोड बातमी आली आहे.भारतात पुन्हा चित्ते वसविण्याच्या विशेष कार्यक्रमांतर्गत, मागील सप्टेंबरपासून नामिबियाहून आठ; तर दक्षिण आफ्रिकेतून १२ असे एकूण २० चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले आहेत. यापैकी नामिबियाहून आणलेल्या ‘सियाया’ या मादीने चार बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांचा जन्म पाच दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे, मात्र वनाधिकाऱ्यांना बुधवारी हे बछडे दृष्टीस पडले.

    ‘सियाया हिने चार बछड्यांना जन्म दिल्याची आनंदाची बातमी आहे. बाळे-बाळंतीण सुखरूप आहेत. आई झाल्यापासून सियायाने दोन प्राण्यांची शिकारही केली आहे,’ अशी माहिती शेवपूर विभागीय वन अधिकारी पी. के. वर्मा यांनी दिली. चित्त्यांचा गर्भावस्थेचा कालावधी सामान्यत: ९० ते ९३ दिवस असतो. नामिबियाहून हे चित्ते १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात आले होते. म्हणजेच, भारतात आल्यानंतरच सियायाला गर्भधारणा झाली असावी, असा अंदाज आहे.

    भारतीय भूमीत जन्माला आलेले हे चार बछडे म्हणजे ‘भारतीय चित्त्यांची’ पहिली पिढी असल्याची भावना व्यक्त होत आहे. १९४७मध्ये भारतातील अखेरच्या चित्त्याची सध्याच्या छत्तीसगढ राज्यातील कोरीया येथे शिकार झाली होती. १९५२मध्ये चित्ता भारतातून नामशेष झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. आफ्रिका खंडातील देशांमधून चित्त्यांचे भारतात स्थलांतर हा भारतात पुन्हा चित्ते वसविण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा भाग आहे. नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांना १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते.

    नामिबियाहून आणलेल्या साशा या मादी चित्त्याचा २७ मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला होता. फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या १२ चित्त्यांना सध्या कुनोमधील विलगीकरणात ठेवण्यात आले असून ते सुदृढ आणि सक्रिय असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

    ताडोबात दिसली बिजलीची माया; आईसोबत लडिवाळपणे खेळणाऱ्या बछड्यांचे दुर्मिळ क्षण कॅमेरात कैद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *