• Mon. Nov 25th, 2024
    Girish Bapat: पुण्यात आले, पण अमरावतीशी नाळ तुटू दिली नाही, गावी ३० एकर शेती, शेतातही रमायचे!

    अमरावती : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे आज बुधवारी निधन झाले. त्यांची कर्मभूमी पुणे जिल्हा असला तरी त्‍यांचे मूळ गाव चांदूर रेल्‍वे तालुक्‍यातील सावंगी मग्रापूर आहे. अनेकवेळा ते आपल्‍या गावी येत. त्यांच्या निधनाचं वृत्त कलताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडालंय. गिरीश बापट यांची सावंगी मग्रापूर येथे शेती असून त्‍यांनी गावी शेती करण्‍यासोबतच २०१७ मध्‍ये वात्‍सल्‍य गोशाळा आणि गोवंश संशोधन केंद्राची उभारणी करून देशी वंशाच्या गाईचे संगोपन केले होते.

    सुमारे ४२ एकर परिसरात विस्तारलेल्या या केंद्रात आजही गौरक्षणाचे कार्य अविरत सुरू आहे. या ठिकाणी भाकड गोवंशाची निगा राखण्‍यासोबतच देशी गायींच्‍या वंशवृद्धी आणि संगोपनाचे कार्य विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साह्याने केले जाते.

    अमरावती जिल्हा हा तसा खासदार गिरीश बापट यांच्या मामाचे गाव. गिरीश बापट यांच्‍या आई प्रतिभाताई बापट यांचे माहेर देखील अमरावती जिल्‍ह्यातीलच आहे. सोनोरा भिलटेक येथील जोशी घराण्‍यातल्‍या प्रतिभाताईंना दोन भाऊ… बाळासाहेब जोशी हे चांदूर रेल्‍वे येथे तर दुसरे मामा यशवंतराव जोशी हे बडनेरा येथे वास्‍तव्‍याला आहेत. तर त्यांचे सख्खे चुलत भाऊ विश्राम बापट अमरावतीत राहतात.

    खासदार गिरीश बापट यांचे कार्यक्षेत्र पुणे असले, तरी ते वर्षातून दोन ते तीन वेळा आपल्या मूळ गावी येत असत. सावंगी म. येथे त्‍यांची सुमारे ३० एकर शेती असून ते शेती देखील पाहत होते. मूळ गावच्या मातीची त्यांना ओढ असल्याने ते अनेकदा आपल्या गावी रमत असत. सावंगी येथे त्‍यांचा वडिलोपार्जित वाडा आहे. खासदार गिरीश बापट यांचे वडील भालचंद्रराव हे कँटॉन्मेंट बोर्डात नोकरीला होते. बदली होऊन ते पुण्‍यात गेले आणि तेथेच ते स्‍थायिक झाले. मात्र, त्‍यांनी आणि त्‍यांच्‍या कुटुंबाने सावंगी मग्रापूरशी असलेली नाळ तुटू दिली नाही.

    खासदार बापट हे राजकारणासोबतच नेहमी समाजकारण आणि रुग्णसेवेत पुढाकार घेत असत. अमरावतीच्‍या संत गाडगेबाबा रक्‍तपेढीच्‍या स्‍थापनेची मूळ संकल्‍पना त्‍यांचीच होती. त्‍यांनी या रक्‍तपेढीच्‍या उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केल्याची माहिती बापट कुटुंबीयांचे निकटवर्तीय श्री गोडबोले यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed