भाजपचा पारंपरिक मतदार असलेल्या पेठांमधील मतदारांनी अपेक्षित साथ न दिल्याचा फटका हेमंत रासने यांना कसबा पोटनिवडणुकीत बसला होता. या पराभवानंतर भाजपच्या गोटात आत्मचिंतन सुरु झाले होते. कसब्यात टिळक कुटुंबीयांऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आपले राजकीय वजन खर्ची घातले होते. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीतील पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांच्यावरही फोडण्यात आले होते. भाजपची उमेदवाराची निवड चुकल्यामुळेच कसब्यात पराभव झाल्याचा एक मतप्रवाह पक्षात आहे.
मात्र, चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना कसब्यात टिळक कुटुंबीयांऐवजी हेमंत रासने यांना का उमेदवारी दिली, याचे कारण स्पष्ट केले. मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता. आजारपणामुळे मुक्ताताईंचं दिसणं, असणं, अस्तित्व हे संपलं होतं. त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा यांना मुक्ताताईंच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला, त्यामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता. मुक्ताताई चांगल्या कार्यकर्त्या होत्या, म्हणून त्या महापौर झाल्या, आमदारही झाल्या. त्यांचे पती सक्रीय आणि त्यांचा मुलगा आमचा पदाधिकारी, पण घरातल्या परिस्थितीमुळे त्यांचा एक्जिस्टन्स कमी झाला होता. त्यामुळेच कसबा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबाबाहेर उमेदवारी दिली, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात आता काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावे लागेल.
पालकमंत्र्यांच्या बैठकीतून रवींद्र धंगेकर उठून निघून गेले
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी शहरातील विविध विषया संदर्भात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीतून कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर अचानक उठून निघून गेले होते. या बैठकीला निमंत्रित आमदारांपेक्षा भाजपचे स्थानिक पदाधिकारी गणेश बिडकर हेच जास्त बोलत होते. ही गोष्ट खटकल्यामुळे रवींद्र धंगेकर या बैठकीतून निघून गेल्याची चर्चा होती. याविषयी चंद्रकांत पाटलांना विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘धंगेकर नाराज होऊन निघून गेले हे मला आत्ता कळतंय. बैठकीत धंगेकर यांनी नाराजी व्यक्त करायला हवी होती. रात गई बात गई…. आता ते आमदार झालेत. लोकप्रतिनिधी झालेत. त्यामुळे त्यांनी आता घरी जेवायला बोलावले तरी जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.