गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यासह राज्याच्या इतर भागांमधील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. घसादुखी, खोकला तसेच दीर्घकाळ राहणारी सर्दी, घशातील दुखणे अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत.त्यादृष्टीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तयारी सुरु केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सोमवारी करोनासंदर्भातील व्यवस्थापनाबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्व राज्यांना खबरदारीचे आदेश देण्यात आले. आगामी काळात सर्व राज्यांना जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांसह आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
देशात पुन्हा करोनाची लाट येण्याची शक्यता कमी आहे. सध्या करोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी मृतांची संख्या कमी आहे. त्यामुळे फार घाबरुन जाण्याचे कारण नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. येत्या १० आणि ११ एप्रिलला संपूर्ण देशातील रुग्णालयांची करोनाशी सामना करण्यासाठी असलेली सज्जता तपासण्यासाठी मॉकड्रिल घेतली जाणार आहे.
विलगीकरण कक्षाची स्थापना
राज्यात सोमवारी ‘एच३ एन२’च्या तीन नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ‘एच३ एन२’च्या रुग्णांची एकूण संख्या ३१८ झाली आहे. तसेच सोमवारी २० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात दिवसेंदिवस ‘एच३ एन२’ आणि ‘एच१ एन१’ रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात १ जानेवारीपासून आत्तापर्यंत इन्फ्लूएंजाचे ३ लाख ३६ हजार ५१८ संशयित रुग्ण सापडले असून त्यांना ऑसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आले आहे. यामध्ये ‘एच१ एन१’चे ४३२; तर ‘एच३ एन२’चे ३१८ रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी ‘एच३ एन२’ने बाधित असलेले २० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, राज्यामध्ये आतापर्यंत ‘एच३ एन२’ने एकाचा मृत्यू झाला असून, तीन संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे.
इन्फ्लूएंजा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तिथे आवश्यक औषधोपचार व साधनसामग्रीचा साठा ठेवण्यात आला असून राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
वडील वारले, आईनं शाळेत भात शिजवून दोन्ही पोरांना वाढवलं; एक लेक शिक्षक तर दुसऱ्याला १ कोटी ७० लाखांची फेलोशिप