मालेगावात होणारी सभा एक ना अनेक कारणांमुळे चर्चेत येत असताना आता पुन्हा जसं मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवला व आदित्यला सांभाळा असा आशयाचा सभेचा बॅनर अधिक चर्चेत आला आहे. मालेगाव शहरात ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या सभेपासून साधारणपणे अर्धा
किलोमीटर अंतराच्या महात्मा फुले चौकात हा बॅनर लावण्यात आलेला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या सभेत केलेल्या भाषणात शिवसैनिकांना आवाहन केले होते. जसं मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा तशा पद्धतीने मालेगावात लावलेल्या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाने आवाहन केले आहे. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे ,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो या बॅनर वर आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर स्थानिक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे राज्यभरात ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचे काम चालू आहे. नाशिकच्या मालेगावात प्रथमच उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक पातळीवरील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांना भावनिक आव्हान करण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी मालेगावात बॅनरबाजी मोठा प्रमाणात करण्यात आली असून उद्धव ठाकरे यांच्या मालेगावचे स्वागत असे देखील बॅनर लागले आहेत आणि त्यातीलच उर्दू भाषेत असलेला बॅनर आणि त्यानंतर आता हा बॅनर अधिक चर्चेत आला आहे.