मिळालेली माहिती अशी की, तुरंबे येथे दोन-तीन दिवसांपूर्वी दोघांमध्ये झालेल्या संभाषणात महापुरुषांचा अवमानकारक मेसेज केल्याचे समोर आले. या संभाषणाचे फोटो गावातील तरुणांच्या व्हॉट्सअपवर व्हायरल झाले. त्यानंतर ही बातमी हळूहळू गावभर पसरली. यामुळे दोन जातींमध्ये तेढ निर्माण होऊ लागला. ऐन यात्रेच्या दिवशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झाले. सर्व तरुणांनी गावातील चौकात एकत्र जमत घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा देत तरुणांनी गावातून मोर्चा काढला. तर प्रार्थनास्थळावरील सर्व स्पीकर उतरवण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला असून शांततेचे आवाहन करत गावची यात्रा सुरळीत पार पाडा, अशी विनंती त्यांनी केली.
त्यानंतर जमाव पांगवला, मात्र सध्या या घटनेमुळे गावातील चौकाचौकांमध्ये पोलीस छावणीचे रूप आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, या गोष्टीचा मुस्लिम संघटनाकडून देखील निषेध व्यक्त करण्यात आला असून तुरंबे गावात हिंदू-मुस्लिम समाजात सलोखा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर करून दोन समाजात द्वेष निर्माण केल्याबद्दलच्या घटनेमुळे संबंधित तरुणाच्या गैरकृत्याबद्दल येथील मुस्लिम समाजाने निषेध करत असल्याचे मुस्लिम बांधवांनी सांगितले.