१० हजार कावेरी जातीचे पक्षी
७ हजार ५०० दैनंदिन अंडी उत्पादन
तीन वर्षांत जवळपास दीड लाख पिलांची मागणी पूर्ण
सोलापूर, दि. 25 (जि. मा. का.) : खरं तर शेती व्यवसाय हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे केवळ शेती व्यवसायावर अवलंबून न राहता जोडव्यवसाय करणे काळाची गरज ठरते. मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील हणमंत धोंडिबा कांबळे यांनी हे जाणले, शेतीला कुक्कुट पालनाची जोड दिली आणि स्वतःची प्रगती केली.
पशुसंवर्धन विभागाच्या सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर सधन कुक्कुट विकास गट स्थापन करणे या योजनेचा पंचायत समिती मोहोळ येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लाभ घेतला आहे. हणमंत कांबळे यांनी त्यांच्या व्यवसायाच्या आजवरच्या प्रवासाची माहिती दिली. ते म्हणाले, मी उपजीविकेसाठी पूर्णपणे शेतीवर अवलंबून होतो. मला पशु संवर्धन विभागाकडून कुक्कुट पालनाविषयी माहिती, मार्गदर्शन मिळाले. २०१० साली मी स्वक्षमतेने २०० गावरान कुक्कुट पक्षांसह संगोपन व्यवसाय सुरू केला. पशुसंवर्धन विभागाकडून वेळीवेळी मार्गदर्शन मिळाल्यामुळे माझ्यामध्ये कुक्कुट पालनाविषयी रूची निर्माण झाली.
श्री. कांबळे यांची ही आवड लक्षात घेऊन त्यांना शासनाकडील नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत १००० मांसल कुक्कुटपक्षी या योजनेसाठी अर्ज करण्यास प्रेरित करण्यात आले. या योजनेअंतर्गत २०१५ साली त्यांना १००० मांसल कुक्कुटपक्षी संगोपनासाठी अनुदान देण्यात आले. त्यानंतर कुक्कुट पालनातून आलेल्या नफ्यातून त्यांनी त्या शेडचे विस्तारीकरण करून ८००० पक्षी क्षमता असणारे शेड बांधकाम पूर्ण केले. नंतर पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नाबार्डकडून अर्थसहाय्य मिळवून १२००० पक्षी क्षमता असणाऱ्या शेडचे विस्तारीकरण केले. त्यानंतर २०१९-२०२० साली त्यांना सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर सधन कुक्कुट विकास गट स्थापन करणे या योजनेची माहिती मिळाली व त्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना अनुदान देण्यात आले. त्यांनी सधन कुक्कुट विकास गट चांगल्या पध्दतीने सुरु ठेवुन त्याचेसुध्दा विस्तारीकरण केले.
या योजनेच्या लाभानंतर व्यवसाय विस्तारीकरणाबद्दल माहिती देताना हणमंत कांबळे म्हणाले, माझ्याकडे ब्रीडर स्टॉक हे सी.पी.डी.ओ. बंगळूरू कडून प्राप्त असून सध्या १०००० कावेरी जातीचे पक्षी आहेत. १,२०,००० क्षमतेचे सेटर मशीन आहे. ३०,००० क्षमतेचे हॅचर आहे. ७५०० दैनंदिन अंडी उत्पादन आहे. मिळणाऱ्या नफ्यातून मी स्वतःची फीड मिल सुरू केली आहे. त्यासाठी लागणारा कच्चा माल (मका व सोयाबीन) हा स्थानिक स्तरावरुन प्राप्त केला. मागील तीन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या एकदिवसीय १०० कुक्कुट पक्षी या योजनेतून ६३०००, ५३००० व ४६२०० एवढी पिल्लांची मागणी पूर्ण केली आहे. या व्यवसायातून माझी आर्थिक उन्नती झाली असून मी माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण करू शकलो. त्याला मी पोलिस उपनिरीक्षक बनवले, याचा अभिमान आहे. मी सोलापूर सोबतच आता अन्य जिल्ह्यातीलसुध्दा कुक्कुट मागणी पूर्ण करीत आहेत.
हणमंत कांबळे यांच्या शेडला भेट देऊन त्यांनी ही योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि प्रादेशिक सहआयुक्त, पशुसंवर्धन डॉ. संतोष पंचपोर यांनी श्री. कांबळे यांचे कौतुक केले आहे.
एकूणच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर सधन कुक्कुट विकास गट स्थापन करणे या योजनेचा लाभ मिळाल्याने हणमंत कांबळे यांचे जीवन खऱ्या अर्थाने बदलले आहे.
०००००
जिल्हा माहिती कार्यालय,
नवीन प्रशासकीय इमारत,
जिल्हाधिकारी कार्यालय आवार,
सोलापूर – 413001.