• Sat. Sep 21st, 2024
मढीच्या यात्रेत पंजाबी गाढवांना लाखोंची किंमत, काठेवाडी आणि गावरान गाढवांची किंमत काय?

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील मढी येथे भरणाऱ्या कानिफनाथांच्या यात्रेत गाढवांचा बाजार प्रसिद्ध आहे. दरवर्षी काठेवाडी व गावरान गाढवांची येथे मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असते. यावर्षी प्रथमच पंजाबमधून गाढवं विक्रीसाठी येथे आली होती. त्यांना लाखांत भाव मिळाला. एका पंजाबी गाढवाला आज एक लाख रुपये भाव मिळाला, तर तीन पंजाबी गाढवं पावणेतीन लाख रुपयांना विकली गेली.

होळी ते रंगपंचमी अशी यात्रा येथे भरते. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढीच्या यात्रेला राज्यभरातून भाविक येतात. गरजेच्या वस्तुंची बाजारपेठ या काळात मढीत भरते. त्यातच गाढवांचा बाजार महत्वाचा असतो. वाहतुकीची साधने वाढल्याने गाढवांचा वापर कमी झाला असला तरी त्यांचा भाव मात्र वाढतच आहे.

करोना काळात यात्रा आणि बाजारही बंद होता. आता तो पुन्हा सुरू झाला आहे. यावर्षी भरलेल्या गाढवाच्या बाजारात प्रथमच मोठी उलाढाल झाली. प्रथमच येथे दाखल झालेल्या पंजाबी गाढवांना लाखो रुपयांची किंमत मिळाली. एका पंजाबी गाढवाला आज एक लाख रुपये भाव मिळाला तर तीन पंजाबी गाढवं पावणेतीन लाख रुपयांना विकली गेली.

कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उत्तर देताना सत्तारांचं धक्कादायक विधान
नेहमीच्या काठेवाडी व गावरान गाढवांनाही चांगली मागणी होती. मढी येथील यात्रेत येण्यापूर्वीच अनेक गाढवं तिसगाव येथे विकण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षी पेक्षा कमी गाढवं आज मढी यात्रेत विकली. त्यामुळे त्यातून मिळणारे ग्रामपंचायतीचे उत्पन्न मात्र घटल्याचे सांगण्यात आले.

होळी, रंगपंचमी व फुलोरबाग अशा तीन टप्य्यात मढी यात्रा भरते. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतल्याने मढी यात्रेचा हा मुख्य दिवस मानला जातो. करोनामुळे दोन वर्षे यात्रा भरली नव्हती. या पार्श्वभूमीवर आज सकाळ पासूनच मढीकडे जाणारे सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.

शिवरायांबद्दल जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट, नागरिकांच्या संतापानंतर पोलिसांची कडक अ‍ॅक्शन
देवस्थान समितीने चांगली व्यवस्था केल्याने मुख्य मंदिरात भाविकांची गैरसोय झाली नाही. ठिकठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. नाथांचा प्रसाद म्हणून भाविक रेवड्या नाथांच्या समाधीला वाहत घरी घेऊन जात होते. रेवड्यांच्या बाजारात मोठी उलाढाल झाली. भाविकांचे स्वागत देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, सचिन गवारे, भाऊसाहेब मरकड, शिवजीत डोके, रवींद्र आरोळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed