मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर गुरूवार दि. 23 व शुक्रवार दि.24 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.
राज्यातील विकास प्रक्रिया समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज आणि निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना मिळावा, तसेच समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी, सुजाण नागरिक तयार व्हावेत या उद्देशाने शासन स्तरावर मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना शासकीय प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. त्यांच्या नव कल्पनांचा अंगीकार राज्याच्या विकासासाठी करता यावा, यासाठी आवश्यक पात्रतेनुसार उमेदवारांची चाचणी परीक्षेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फेलोशिपसाठी निवड करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या उपक्रमाची माहिती व उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी याबाबतची सविस्तर माहिती श्रीमती प्रिया खान यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.