मुंबई, दि. २१:महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा आग्रा येथील लाल किल्यात असणाऱ्या दिवाण ए आम या ठिकाणी मोठ्या दिमाखात व उत्साहात संपन्न झाला. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्यातून शक्य झालेल्या या कार्यक्रमासाठी केंद्रीय संस्कृती मंत्री किशन रेड्डी आणि उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आभार व्यक्त केले आहेत.
लाल किल्ला परिसरात झालेल्या पत्रकार वार्तालापात त्यांनी नमूद केले की, छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे जनतेवर असणारे प्रेम हे संपूर्ण जगासाठी असणारे दुर्मिळ उदाहरण असून, अशा या राजाची जडणघडण जिजाऊ मातेने सांगितलेल्या नीतिमत्ता आणि रयत प्रेमाच्या कथांमधून झाली आहे.
आग्रा येथील लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी केंद्र शासनाच्या पुरातत्व खात्याकडून काही परवानग्यांची आवश्यकता होती. अजिंक्य देवगिरी या संस्थेस परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे या कार्यक्रमाचे सह आयोजक या नात्याने, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने पुरातत्व खात्यास अर्ज करण्यात आला होता. यासाठी सांस्कृतिक कार्य विभाचे प्रधान सचिव व संचालक सांस्कृतिक कार्य यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते असेही श्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकारातून या परवानग्या प्राप्त झाल्या होत्या. ज्या ठिकाणी छत्रपतींना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते, त्याच दिवान ए आम समोर शिवजयंती साजरी झाल्याचा महाराष्ट्रातील तमाम जनतेस अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी महाराष्ट्र शासनाने लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करावी अशी मागणी अनेक शिवभक्तांनी श्री. मुनगंटीवार यांच्याकडे केली. छत्रपतींच्या शौर्याचा वारसा सांगणाऱ्या भव्य स्मारकाची उभारणी महाराष्ट्र शासनाने करावी अशीही मागणी स्थानिक शिवभक्तांनी यावेळेस केली. छत्रपतींचा वारसा आणि त्यांची शिकवण साऱ्या जगाला प्रेरणादायी आहे, त्यांच्या अद्वितीय कार्याचे स्मरण आपण नित्य केले पाहिजे असे यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी उपस्थित शिवभक्तांना सांगितले.