मुंबई, दि. 8 : बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये शस्त्रास्त्रे, हत्यार, संक्षारक पदार्थ किंवा स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत 5 मार्चपर्यंत कलम 37 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.
बृहन्मुंबईचे पोलिस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले असून कलम 37 चे उप कलम (1) आणि (2) कलम 2 चे पोटकलम (6) आणि कलम 10 चे पोटकलम (2) महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 द्वारे 04 फेब्रुवारीपासून ते 5 मार्च 2023 पर्यंत पूर्ण बृहन्मुंबईमध्ये विविध गोष्टींना प्रतिबंधित करण्यात आले आहे.
या प्रतिबंधात्मक आदेशानुसार बृहन्मुंबईमध्ये शस्त्रे, अग्निशस्त्रे, बॅटन, तलवारी, भाले, दंडुके, सोटे, बिना परवाना बंदुका, चाकू, काठ्या किंवा लाठ्या किंवा इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाठी वापरली जाऊ शकते अशी हत्यारे बाळगण्यावर मनाई करण्यात आली आहे. बंदुकीचे परवानाधारक किंवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून, अशी शस्त्रे वाहून नेण्यासाठी विशिष्ट परवानगी असलेल्यांना यातून वगळण्यात आले आहे.
कोणताही संक्षारक पदार्थ किंवा स्फोटके वाहून नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा उपकरणे किंवा क्षेपणास्त्रे टाकण्याची किंवा प्रक्षेपित करण्याची साधने, वाहून नेणे, गोळा करणे आणि तयार करणे, व्यक्ती किंवा प्रेत किंवा आकृती किंवा पुतळे यांचे प्रदर्शन, सार्वजनिक टिकाकरण उच्चार, गाणी गाणे, संगीत वाजवणे, बृहन्मुंबई शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याच्या मते, शालिनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तू किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे जेणे करून सामाजिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकण्यास कारणीभूत ठरू शकेल अशा बाबी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.
जर कोणतीही व्यक्ती अशा कोणत्याही वस्तूसह सशस्त्र जात असेल किंवा अशा प्रतिबंधाचे उल्लंघन करत कोणताही उपरोधक पदार्थ किंवा स्फोटक किंवा क्षेपणास्त्र घेऊन जात असेल, अशा व्यक्तींना कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यामार्फत निशस्त्र किंवा त्यांच्याकडील वस्तू, उपरोधिक पदार्थ, स्फोटक किंवा क्षेपणास्त्र जप्त केले जाईल.
हा आदेश कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेत किंवा नोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या वरिष्ठांना किंवा त्याच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार, शस्त्रे बाळगण्यासाठी लागू होणार नाही. तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार जे साडेतीन फूटापर्यंत लांबीच्या लाठ्या बाळगत आहेत, अशांना लागू होणार नाही.
दि. 5 मार्च 2023 नंतर या आदेशाची मुदत संपली तरीही कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते. या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेल्या कोणत्याही दंड, जप्ती किंवा शिक्षा लागू केल्या जाऊ शकतात, असेही आदेशात म्हटले आहे.
00000
पवन राठोड/स.सं/