• Tue. Nov 26th, 2024

    १० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

    ByMH LIVE NEWS

    Feb 1, 2023
    १० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

    नवी दिल्ली, 01 :  महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या  ब्रॉडग्रेज रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण या वर्षाच्या अखेरपर्यंत  करण्यात येईल, राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. यासह राज्यात सध्या 8 ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया सुरू असून येत्या 10 फेब्रुवारीला आणखी दोन वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज येथे दिली.

    केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी श्री. दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी  पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. दानवे यांनी माहिती दिली.  ते म्हणाले, आज सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वांसाठी आहे. मध्यम वर्गीयांना न्याय देणारा, हा अर्थसंकल्प दूरदृष्टी ठेवून मांडलेला आहे.

    रेल्वेला वर्ष 2014 पासून भरीव आर्थिक तरतूद केली जाते. महाराष्ट्राला 16 हजार कोटी रूपये मागील अर्थसंकल्पात देण्यात आले होते. त्यातून राज्यातील रेल्वे प्रकल्पाची बरीच प्रलंबित कामे झालेली आहेत.

    भारतात येत्या काळात एकूण 400 ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया धावतील. यातील सध्या 8 वंदे भारत रेल्वेगाड्या राज्यात आहेत. येत्या 10 फेब्रुवारीला आणखी दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याची, माहिती श्री. दानवे यांनी यावेळी सांगितले. या वंदे भारत रेल्वेगाड्या सोलापूर ते मुंबई पहिली आणि दूसरी मुंबई ते शिर्डी  अशा असणार आहेत.

    वंदे भारत एक्सप्रेस

    वंदे भारत एक्सप्रेस 2.0 अनेक उत्कृष्ट आणि अधिक गतीचा अनुभव देते. ही रेल्वेगाडी  प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, यात  रेल्वे गाड्यांची धडक टाळण्यासाठीची  स्वदेशी विकसित ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम – कवच  समाविष्ट आहे. वंदे भारत 2.0 अधिक अत्याधुनिकतेने सुसज्ज आहे आणि ही गाडी केवळ 52 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकतो आणि या रेल्वेगाडीचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर  पर्यंत पोहोचतो, ही या रेल्वेगाडीची सुधारित वैशिष्ट्ये आहेत. सुधारित वंदे भारत एक्‍सप्रेसचे वजन 392 टन आहे, जे आधी  430 टन होते. यात वाय-फाय कंटेंट ऑन-डिमांड सुविधाही उपलब्ध आहे . या रेल्वेगाडीच्या मागील आवृत्‍तीत असलेल्या  24 इंच रुंदीच्या स्‍क्रीनच्‍या तुलनेत प्रत्‍येक डब्यामध्ये 32 इंच रुंदीचे स्‍क्रीन आहेत ज्याद्वारे प्रवाशांना  माहिती आणि मनोरंजन उपलब्ध होते. या गाडीतील वातानुकूलन 15 टक्के अधिक ऊर्जा कार्यक्षम असल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस पर्यावरणस्नेही देखील  ठरत आहे ट्रॅक्शन मोटरच्या माध्यमातून धूळ-मुक्त स्वच्छ हवा वातानुकूलनासह, या रेल्वेगाडीतील प्रवास अधिक आरामदायी  होणार आहे. आरामदायी आसनांची म्हणजेच साइड रिक्लायनर सीटची सुविधा जी पूर्वी फक्त एक्झिक्युटिव्ह श्रेणीतील प्रवाशांना दिली जात होती ती आता सर्व श्रेणीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. एक्झिक्युटिव्ह डब्यामध्ये  180-अंशात  फिरणाऱ्या आसनांचे अतिरिक्त वैशिष्ट्य आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन डिझाईनमध्ये, हवा शुद्धीकरणासाठी असलेल्या रूफ-माउंटेड पॅकेज युनिटमध्ये (आरएमपीयु) फोटो-कॅटॅलीस्ट अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली स्थापित करण्यात आली आहे. चंदीगढच्या केंद्रीय वैज्ञानिक उपकरणे संस्थेने केलेल्या शिफारसीनुसार,  ताजी हवा आणि परतीच्या हवेतून येणारे जंतू, जीवाणू, विषाणू इत्यादींपासून मुक्त हवा गाळून स्वच्छ करण्यासाठी डिझाईन केलेली  प्रणाली आरएमपीयूच्या दोन्ही टोकांवर स्थापित करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed