मुंबई, दि. १८ : कोकणात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. काजू बोंडापासून उपउत्पादन तसेच वाईन तयार करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काजू बोंडांची विक्री इतर राज्यात शेतकऱ्यांना करावी लागते. आपल्याच राज्यात यावर प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यासाठी उत्पादकांना सहकार्य करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काजू बोंडापासून उपउत्पादन तयार करण्याबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस आमदार राजेश पाटील, आमदार योगेश कदम, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, उपसचिव युवराज अजेटराव यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. देसाई म्हणाले, शासनाने मोहफूल व काजूच्या बोंडापासून तयार होणाऱ्या मद्याला विदेशी मद्याचा दर्जा दिला असून त्यासाठी धोरण तयार केले आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. काजू पिकावर प्रक्रिया करणारे उद्योगही काही प्रमाणात त्या भागात आहेत. काजू पिकाच्या बाबतीत काजू बोंडापासून उपपदार्थाची तसेच वाईनची निर्मिती करता येते. उपपदार्थाच्या उत्पादन व विक्रीबाबत उत्पादकांना येणाऱ्या अडचणीबाबतही पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
*****
शैलजा पाटील/विसंअ/