• Sat. Sep 21st, 2024

पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक; मत कसे नोंदवाल? निवडणूक आयोगाच्या सूचना

ByMH LIVE NEWS

Jan 17, 2023
पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक; मत कसे नोंदवाल? निवडणूक आयोगाच्या सूचना

पदवीधर मतदारसंघ निवडणूक

अमरावती, दि. 17 :  पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करताना पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान पद्धतीबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मतदारांनी मतदानाचे कार्य पार पाडावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

मतदान करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. मतदान करताना केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केचपेननेच मत नोंदवावे. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपेनचा वापर करण्यात येऊ नये. आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम नोंदवावा’ या रकान्यात ‘1’ हा अंक लिहून मत नोंदवावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता.

आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 2, 3, 4 इत्यादीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवता येतील. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा. तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये.

पसंतीक्रम केवळ अंकांमध्येच नोंदवावेत

पसंतीक्रम हे केवळ 1,2,3  इत्यादी अंकामध्येच नोंदविण्यात यावेत. ते एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांमध्ये नोंदवू नयेत. पसंतीक्रम नोंदविताना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात जसे १, २, ३ इत्यादी किंवा रोमन अंक स्वरूपात I, II, III किंवा मराठी भाषेतील देवनागरी 1,2,3  या स्वरूपात नोंदवावे.

मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये. तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविताना टिकमार्क ‘’ किंवा क्रॉसमार्क ‘×’ अशी खूण करू नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल. आपली मतपत्रिका वैध ठरावी यासाठी आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही. या सूचनांचे पालन करून मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed