• Mon. Nov 11th, 2024

    महाराष्ट्रातील सागरी किनारा परिक्रमेसाठी संपूर्ण सहकार्य – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

    ByMH LIVE NEWS

    Jan 16, 2023
    महाराष्ट्रातील सागरी किनारा परिक्रमेसाठी संपूर्ण सहकार्य – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

    नवी दिल्ली, दि. १६ : महाराष्ट्राला लाभलेल्या  ७२० किलोमीटरच्या सागरी किनाऱ्याची केंद्रीय सागर परिक्रमा उपक्रमांतर्गत परिक्रमा करून येथील मच्छिमारांशी थेट संपर्क करून समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र संपूर्ण सहकार्य करेल, असे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

    केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्या अध्यक्षतेत सागर परिक्रमा टप्पा 3 च्या आढावा बैठकीचे आयोजन गरवी गुजरात भवन येथे करण्यात आले. या बैठकीस केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री संजीव बालियान, राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार विनायक राऊत, आमदार सुनील राणे, मासेमारी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम वानखेडे, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव तथा मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे, यांच्यासह केंद्र शासनातील मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    भारताला एकूण 8 हजार किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. यंदाचे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असून या वर्षात सागरी भागातील मासेमारी व्यवसायाशी निगडित समस्या, अडचणी  जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने सागर परिक्रमा हा प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत सागरी मार्गातून परिक्रमा करून प्रत्यक्ष मासेमारी करणाऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना समजून घेण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. रूपाला यांनी यावेळी सांगितले. यांतर्गत गुजरात राज्याची परिक्रमा पूर्ण झालेली आहे. पुढचा 3 आणि 4  टप्पा महाराष्ट्राचा आहे.  सागरी परिक्रमेच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्यांना केंद्र शासनाच्या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा, असा मानस असल्याचेही श्री. रूपाला म्हणाले.

     

    सागर परिक्रमा या उपक्रमाचे कौतुक करीत श्री. मुनगंटीवार म्हणाले, केंद्र शासनाकडे मत्स्यव्यवसायाशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती राज्यांनाही देण्यात यावी तसेच अशा तंत्रज्ञानाचे उपकेंद्र राज्यात स्थापित करावे. यासह पांरपरिक मासेमारांसाठी आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्यांसाठी देशभर समान नियमावली असावी. सध्या यात तफावत दिसत असल्याचे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निर्दशानास आणून दिले.

    ज्या राज्यांमध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते, केंद्राने अशा राज्यांची दोन दिवसीय परिषदेचे आयोजित करावी, अशी विनंती श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना लागून सागरी किनारा आहे. परंतु, राज्यात अंतरदेशीय मासेमारीही मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच मासेमारी विक्रीच्या कामात हजारो लोक गुंतले आहेत. माश्यांची साठवणूक, विक्री संदर्भातील तसेच अन्य अडचणी आहेत. सार्वजनिक खाजगी भागीदारीतून मॉडेल तयार करून याचा लाभ मासेमारी व्यवसायातील लोकांना वर्षभर होईल, अशी योजना केंद्रीय स्तरावर असावी, अशी अपेक्षा श्री मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

    यासह किसान क्रेडीट कार्ड, मासेमारांसाठी पायाभूत विकास, जुन्या जेट्टींचे निराकरण, अशा महत्त्वपूर्ण विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. केंद्रीय मंत्री श्री. रूपाला यांचा महाराष्ट्रातील सागर परिक्रमा योजनेंतर्गत टप्पा-3 आणि 4 मध्ये अधिकाधिक मासेमारांशी थेट संपर्क होईल, असे नियोजन केले जाईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

    000

    अंजु निमसरकर /वि.वृ.क्र. 6 /दि. 16.01.2023

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed