• Mon. Nov 25th, 2024

    लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी युवक-युवतींनी मतदार नोंदणी करावी – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

    ByMH LIVE NEWS

    Jan 16, 2023
    लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी युवक-युवतींनी मतदार नोंदणी करावी – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

    सातारा, दि.15 : जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्रबिंदू हा मतदार आहे. या लोकशाहीला अधिक बळकट बनविण्यासाठी प्रत्येक युवक-युवतींनी मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन  मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

    मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने युवा पिढी आणि लोकशाही मूल्ये या विषयावर फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात परिसवंदाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. या यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकार निता शिंदे-सावंत, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार समीर यादव, राज्य निवडणूक आयोग कार्यालयातील पल्लवी जाधव, मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. दीपक पवार, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ, अरविंद मेहता, थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे संपादक दिनकर गांगल,  दै. लोकमत उपसंपादक प्रगती पाटील, पत्रकार स्वप्नील शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सत्यजित गुरव, ॲङ सुस्मिता धुमाळ आदी उपस्थित होते.

    मतदार यादी तयार करणे हे तांत्रिक काम असल्याचे सांगून मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, प्रत्येक पाच वर्षांनी निवडणूक होते म्हणून लोकशाहीचा ढाचा आजही अबाधित आहे. निवडणूक आयोगाचे काम निवडणुका घेण्यापुरते  मर्यादित न ठेवता त्यापुढे जाऊन लोकशाहीची मुल्ये तरुणांमध्ये रुजविण्याचेही काम करीत आहे. लोकशाही गप्पा हे एक व्यासपीठ आहे. यामध्ये समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून चर्चा केली जात आहे.

    लोकशाहीसाठी लोकसंख्येमधील  पात्र नागरिकांचे मतदार यादीत नाव येणे गरजेचे आहे. देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात आहे. युवकांचा सहभाग असल्याशिवाय लोकशाहीचा टप्पा पूर्ण होणार नाही. आज जे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे ते तरुण पिढीसाठी आहे. तरी युवक-युवतींनी जास्तीत-जास्त मतदार यादीत नाव नोंदणी करुन लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असेही आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी केले.

    या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    00000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed