• Fri. Nov 15th, 2024

    युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी – आमदार प्रणिती शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Dec 22, 2022
    युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी – आमदार प्रणिती शिंदे

    नागपूर, दि. 22 :- युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी, या चळवळीतूनच जनसामान्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

    राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात आज ‘संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळींचे योगदान” या विषयावर आमदार प्रणिती शिंदे  यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

    यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देशातील सामान्य जनतेच्या विविध प्रश्नावर युवकांनी जागृत राहून चांगल्या भावनेतून काम करणे आवश्यक आहे. या कामातूनच आपले राजकीय भवितव्य घडवायचे आहे. यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. युवकांनी लोकशाहीसाठी मतदार नोंदणीमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. महिला व युवकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी काम केले पाहिजे. देशात विविध विचारप्रणाली आहेत. आपल्या आवडीच्या व योग्य विचाराप्रणालीत सहभागी होऊन नागरिकांच्या समस्या सोडवून देशातील लोकशाहीसाठी काम करणे आवश्यक आहे. देशात विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून युवकांना राजकीय भवितव्य घडविण्यासाठी संधी मिळू शकते. महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहे. युवक-युवतींना राजकारणामध्ये येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी संधी आहे.

    युवकांनी जनमत व कार्यप्रणाली याची सांगड घालून काम करावे. स्वावलंबी होण्यासाठी कठोर मेहनत घेवून सतत प्रयत्न केले पाहिजे. समुपदेशनाद्वारे वैयक्तिक समस्या सोडवाव्यात. त्यासाठी मदत घ्यावी, संकोच बाळगू नये. महिलांचा आदर केला पाहिजे. घरापासूनच महिलांचा सन्मान करणे आवश्यक आहे. समाजाच्या आशा आकांक्षा युवकांच्या हाती असतात. लोकशाही संवर्धनासाठी युवकांनी सतत जागरुक राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार श्रीमती शिंदे यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.

    यावेळी प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी श्रीमती शिंदे यांचा परिचय करुन दिला. अवर सचिव सुनिल झोरे यांनी आभार व्यक्त केले.

    ००००

    दत्तात्रय कोकरे/जिमाअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed