सातारा दि 5 – डोंगराळ भागात दळणवळण चांगले असणे महत्त्वाचे आहे. ही गरज समजून डोंगरात वसलेल्या प्रत्येक गावापर्यंत रस्ते पोहचविण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील भोसगाव ते अंब्रूळकरवाडी रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ते आज बोलत होते.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी चांगल्या रस्त्यांची आवश्यकता असल्याचे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, पाटण तालुक्यातील 70 टक्के भाग हा डोंगराळ आहे. या सर्व भागात आता पक्के रस्ते पोहचले आहेत. तालुक्यातील विकासाची ही कामे नागरिकांसाठी महत्त्वाची आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना सुविधा पुरविण्याचे काम करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना मदत करणे ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये प्रती शेतकरी निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे. मराठवाडी धरणाच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल. विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही पालकमंत्री श्री देसाई म्हणाले.
यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.