• Wed. Nov 27th, 2024

    अन्न व औषध प्रशासनामार्फत २९ कोटी रुपयांचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त

    ByMH LIVE NEWS

    Nov 5, 2022
    अन्न व औषध प्रशासनामार्फत २९ कोटी रुपयांचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त

    मुंबई, दि.5 : अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्यपदार्थांचा दर्जा खात्रीशीर रहावा तसेच ग्राहकांना सुरक्षित व आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळावे यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या तपासणी मोहिमेंतर्गत टीटीसी इंडस्ट्रियल एरिया येथे धाड टाकून परदेशातून आयात करण्यात आलेला 29 कोटी रुपयांचा भेसळयुक्त अन्न पदार्थ साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली आहे.

    नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्याकरिता अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्न आस्थापनांच्या तपासण्या व अन्न नमुने तपासणीचे काम सुरू आहे. अन्न आस्थापना व कोल्ड स्टोरेज व गोदामांमध्ये अचानक भेट देऊन धाड टाकण्यात आली. या दरम्यान 29 कोटी रूपयांची आयात करण्यात आलेल्या अन्न पदार्थांची जप्ती करण्यात आली आहे. यामध्ये मे. सावला फूड्स ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रायवेट लिमिटेड डी-39, व सावला फूड्स अॅड कोल्ड स्टोरेज प्रायवेट लिमिटेड डी-514, टीटीसी इंडस्ट्रीअल एरिया, MIDC तुर्भे, या पेढ्यांमधून अन्न पदार्थाचे एकूण ३५ नमुने विश्लेषणासाठी घेऊन त्यांचा उर्वरित साठा जप्त करण्यात आला आहे.

    साठवणूक केलेल्या काही अन्न पदार्थांचा दर्जा निकृष्ट असल्याने व कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने तसेच अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झाल्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन संबंधित अन्न पदार्थांचा उर्वरित साठा जप्त करून परवाना धारकांच्या ताब्यात पुढील आदेश होईपर्यंत ठेवण्यात आलेला आहे.  जप्त करण्यात आलेले सर्व अन्न नमुने हे अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा, मुंबई येथे विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेले असून विश्लेषण अहवाल प्रथम प्राधान्याने देण्याबाबत कळविण्यात आले आहे. तपासणी अहवालामध्ये आढळून आलेल्या गंभीर त्रुटींबाबत तपासणी अहवाल संबंधित सहायक आयुक्त (अन्न), ठाणे यांना पुढील योग्य त्या कायदेशीर कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed