• Wed. Nov 27th, 2024

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोर्टी ते वाखरी रस्त्याचे भूमिपूजन

    ByMH LIVE NEWS

    Nov 3, 2022
    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोर्टी ते वाखरी रस्त्याचे भूमिपूजन

    पंढरपूर, दि. ३ (उ. मा. का.) – येथील कोर्टी (कराड चौक) ते वाखरी (बाह्य वळण रस्ता) या रस्त्याचे  भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुदळ मारून आज येथे करण्यात आले.

    यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, प्रांत अधिकारी गजानन गुरव, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

    श्री क्षेत्र देहू आळंदी पंढरपूर नेवासा पालखीतळ / मार्ग विकास आराखडा अंतर्गत तीर्थक्षेत्र मौजे पंढरपूर येथील कोर्टी ते वाखरी या ३ किलोमीटर रस्त्याच्या सुधारणा कामासाठी रुपये 15 कोटी 27 लक्ष निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचा कार्यारंभ आदेश 14 सप्टेंबर 2022 रोजी काढण्यात आला आहे. या रस्ता कामासाठी एकूण 35,923.37  चौ. मी.  क्षेत्र भूसंपादित करण्यात आले आहे.  यामध्ये खाजगी क्षेत्र 20553.88 चौ. मी.  व शासकीय क्षेत्र 14749.49 चौ मी. संपादित केले आहे.

    या कामामध्ये भरावकाम, जी.एस.बी. काम, डब्ल्यू. एम. एम. काम, डी. बी., दोन पुलमोऱ्या बांधणे, रोड जंक्शन सुधारणा करणे, रोड साइड फर्न‍िचर करणे, गटार काढणे आदि कामांचा समावेश आहे. कामासाठी जागेचे भूसंपादन पूर्ण झाले असून संपादित जागा शासनाच्या ताब्यात आहे. पंढरपूर शहरामध्ये सद्यस्थ‍ितीत अनवली, कासेगाव, मंगळवेढा, सांगोला, टाकळी व कराड रस्ता येथून येणारी वाहतूक ही बाह्यमार्गाद्वारे जाणे आवश्यक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बाह्यवळण रस्ता पंढरपूर शहरालगत करण्यात आला आहे.  रस्त्यावरून येणारी वाहतूक पंढरपूर नगरपरिषद हद्दीतून व उपनगरातून जात आहे. या रस्त्यावरील जड वाहतुकीमुळे पंढरपूर शहरात वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमिवर कोर्टी वाखरी रस्ता पर्यायी बाह्यवळण रस्ता म्हणून वापरला जाणार आहे.

    वारकरी भाविकांना अधिकच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी बाह्यवळण रस्त्याचा उपयोग होणार आहे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed