• Fri. Nov 15th, 2024

    दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालणे आवश्यक – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर

    ByMH LIVE NEWS

    Oct 28, 2022
    दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालणे आवश्यक – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर

    मुंबई दि. 28 :- दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशातील सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते.

    दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी (26/11) मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष तथा गॅबॉन प्रजासत्ताक देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मायकल मौस्सा अडामो प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत श्रीमती रूचिरा कंबोज यांनी केले.

    भारत 2022 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचा अध्यक्ष आहे. या समितीमध्ये सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्रसंघाच्या 15 देशांतील राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची दोन दिवसीय बैठक भारतात होत आहे. उद्या दिल्ली येथे बैठक आहे. मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे बैठक झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीने ‘दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याशी लढा’ या विषयावर अनौपचारिक चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. यात स्थानिक आणि क्षेत्रीय पातळीवरील उपाययोजनांसंदर्भात चर्चा झाली.

    परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर म्हणाले, दहशतवाद विरोधात लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. दहशतवाद आणि त्यांच्या प्रायोजकांविरुद्ध ठोस कारवाई करावी लागेल. दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थाने, प्रशिक्षण स्थळे शोधून त्यांना असलेले राजकीय समर्थन आर्थिक आणि वैचारिक संरक्षण नष्ट करणे आवश्यक आहे.

    गेल्या काही वर्षांत, दहशतवादी गटांनी त्यांना मिळत असलेल्या मिळकतीच्या पद्धतीमध्ये  विविधता आणली आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. वित्तपुरवठ्यासाठी उपलब्ध असलेल्या अनामिकतेचा फायदा घेऊन व्हर्च्युअल चलने वापरून निधी उभारणी सुरु केली आहे. या संदर्भात, अधिक विचारमंथन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला विचारात घेऊन नाविन्यपूर्ण उपाय योजण्यासाठी उद्या नवी दिल्ली येथे होणाऱ्या समितीच्या विशेष बैठकीत चर्चा होईल, अशी अपेक्षा डॉ. जयशंकर यांनी व्यक्त केली.

    दहशतवादविरोधी लढाई सामूहिकपणे लढणे गरजेचे

    – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    दहशतवादविरोधी लढाई ही सर्वांनी एकत्रितपणे आणि एकजुटीने लढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केले. या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीची महत्वपूर्ण परिषद मुंबईत झाली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी ज्या ताजमहाल हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला तेथे या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल संयुक्त राष्ट्र समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना त्यांनी मनापासून धन्यवाद दिले.

    देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाच्या सुरक्षेविषयी महत्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांसह सर्व राज्याचे गृहमंत्री उपस्थित असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी यावेळी दिली.

    26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

    सुरूवातीला दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत (26/11) झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. गॅबॉन प्रजासत्ताकचे परराष्ट्र मंत्री तथा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष मायकेल मौस्सा अडामो यांच्यासह भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्षा आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत रूचिरा कंबोज यांनी केले.

    0000

    महत्वाची क्षणचित्रे :-

    • श्रद्धांजली वाहताना उपस्थित सदस्यांमध्ये गॅबॉन, मेक्सिको, भारत, नॉर्वे, घाना, चीन, युके, माल्टा, युएई, मोझांबिक, अल्बानिया, इक्वाडोर, ब्राझील, स्वित्झर्लंड, रशिया, जपान, युएसए, युएसजी युएनओसिटी, फ्रान्स, आयर्लंड, एईडी सिटीईडी, युएनआरसी, केनियाच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
    • दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांनी मनोगत व्यक्त केले. यात छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर जखमी झालेली देविका रोतवाल, हवाई सुंदरी निधी चाफेकर, ताज हॉटेलचे महाव्यवस्थापक करणबीर सिंग यांनी आपले अनुभव कथन केले. तर, त्यावेळी दोन वर्षाचा असलेला मोशे याने ध्वनिचित्रमुद्रीत संदेश दिला.
    • शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन त्यांच्या पत्नी श्रीमती वैशाली तुकाराम ओंबळे यांच्या समवेत उपस्थित सदस्यांनी छायाचित्र घेतले.
    • केंद्र शासनाचे सहसचिव शफी रिझवी यांनी ‘दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याशी लढा’ या विषयावर सादरीकरण केले.
    • केंद्रीय सह सचिव पंकज ठाकूर यांनी 26/ 11 रोजी झालेला हल्ला, त्यात हुतात्मा झालेले लोक, तपासाची पद्धती आणि काही महत्वपूर्ण घडामोडींबाबत यावेळी सादरीकरण केले. दहशतवादी साजिद मीर याची कट रचत असताना करत असलेल्या संवादाची ध्वनीफीत देखील ऐकविली.
    • यावेळी संयुक्त राष्ट्र परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या सदस्य राष्ट्राच्या प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. यात युके, यूएसए, युएई, ब्राझिल, रशिया, फ्रान्स, आयर्लंड, केनिया, मॅक्सिको, नॉर्वे, चीन आदींचा समावेश होता.
    • संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी नुकतीच हॉटेल ताज येथे भेट देऊन 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली होती. या कार्यक्रमाची ध्वनीचित्रफित यावेळी दाखविण्यात आली.
    • 26/11चा हल्ला आणि त्याविषयाची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. यासंदर्भातील प्रदर्शन यावेळी लावण्यात आले.
    • हा कार्यक्रम परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आयोजित केला होता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *