मुंबई, दि. 20 : राज्य शासनामार्फत भ्रष्टाचारास प्रतिबंध करणे आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दि 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहाचे‘ आयोजन ‘भ्रष्टाचारमुक्त भारत, विकसित भारत’ ही संकल्पना घेऊन करण्यात आले आहे.
भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असल्याने तसेच अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय दक्षता आयोगाकडून दरवर्षी देशभरात ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन केले जाते.
दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थामार्फत या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 31 ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने याचा प्रारंभ होईल. सर्व अधिकारी आणि कर्मचारी ही प्रतिज्ञा घेतील.
तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क क्रमांक
भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास नागरिकांनी त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास खालील संपर्क माध्यमातून कळविण्याचे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात आले आहे.
टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक 022-24921212, वेबसाईट acbmaharashtra.gov.in, ईमेल–[email protected]/ [email protected], फेसबुक – https://www.facebook.com/MaharashtraACB/, मोबाईल ॲप – www.acbmaharashtra.net, ट्वीटर – @ACB_Maharshtra, व्हॉट्सॲप – 9930997700
००००
मनीषा पिंगळे/विसंअ/