• Fri. Nov 15th, 2024

    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट काढणार – मत्स्य व्यवसाय विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार

    ByMH LIVE NEWS

    Oct 11, 2022
    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट काढणार – मत्स्य व्यवसाय विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. 11 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून, या निमित्ताने लवकरच विशेष टपाल तिकीट काढण्यात येईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

    मत्स्य व्यवसाय विभाग आणि भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फिलाटेली दिवसाच्या निमित्ताने एक जिल्हा एक उत्पादन यासाठी मुंबई शहर जिल्ह्यासाठी चंदेरी पापलेट या माशाचे विशेष टपाल लिफाफ्याचे प्रकाशन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, वन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) डॉ. वाय.एल.पी.राव, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्तर जनरल स्वाती पाण्डेय आदी उपस्थित होते.

    मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, मागील काळात वन मंत्री असताना वन विभागासाठी अनेक टपाल तिकीटे काढण्यात आली होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना या वर्षीही विशेष टपाल तिकीट काढण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असलेला टपाल विभाग अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांशी जोडलेला विभाग आहे. आपल्या सुख-दु:खांशी जोडल्या गेलेल्या या विभागाने येणाऱ्या काळातही जनसेवेमध्ये अग्रेसर राहावे.

    जागतिक फिलाटेली दिवस अर्थात टपालाच्या तिकीटांचा संग्रह करण्याचा दिवस यानिमित्ताने ‘एक जिल्हा एक उत्पादन’ यासाठी चंदेरी पापलेट यावर आधारित विशेष टपाल लिफाफ्याचे अनावरण करण्यात आले. मुंबई शहरात समुद्राचा मोठा भाग असल्याने एक जिल्हा एक उत्पादनासाठी मत्स्य व्यवसायाशी संबंधित उत्पादन निवडण्यात आले असल्याचे श्रीमती पाण्डेय यांनी आपल्या निवेदनात सांगितले.

    ००००

    वर्षा आंधळे/विसंअ/11.10.22

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *