• Mon. Nov 25th, 2024

    जनावरांसाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवा – मंत्री दादाजी भुसे

    ByMH LIVE NEWS

    Sep 14, 2022
    जनावरांसाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवा – मंत्री दादाजी भुसे

    नाशिक, दि. : 14 (जिमाका वृत्तसेवा): देशपातळीसह अनेक राज्यात गोवंश जनावरांमध्ये लम्पी स्किन आजार मोठ्या प्रमाणावर फैलावतो आहे. या संक्रामक व सांसर्गिक आजारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यात तालुकानिहाय स्थळ भेटीद्वारे जनावरांसाठी लम्पी आजार प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचना बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रादेशिक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.बी.आर नरवाडे, पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे येथील सहआयुक्त डॉ.सुनिल गिरमे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी  डॉ.विष्णू गर्जे आदी उपस्थित होते.

    श्री भुसे  म्हणाले की, जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील  पांगरी व  दुसंगवाडी, देसवंडी व गुळवंच या गावातील जनावरांमध्ये लम्पी आजाराचा संसर्ग दिसून आला आहे. संसर्ग केंद्रांपासून 5 कि.मी बाधित क्षेत्र म्हणून प्रतिबंधित करण्यात आले आहे.  राज्यात शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना 1 कोटी रूपयांचा निधी ‘लंपी’ आजार लस खरेदी व यासंदर्भातील प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजनासाठी  वितरीत करण्यात आला आहे. तालुकानिहाय प्रत्येक पशुवैद्यकीय अधिकारी यांनी स्वत: स्थळभेट करून जनावरांची तपासणी करून लसीकरण करावे. यासोबतच लम्पी आजाराबाबत घ्यावयाची काळजी व निगारणी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. गावागावात गोचिड, डास निर्मूलन व स्वच्छता मोहीम  राबविण्याच्या सूचनाही  श्री भुसे यांनी यावेळी दिल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *