• Sat. Sep 5th, 2026

Vishwas Nangare Patil: माझ्या दिवसाची सुरुवात गणपती स्तोत्राने होते; डीजेबंदीवरून संभ्रम निर्माण होताच विश्वास नांगरे पाटलांनी मांडली बाजू

नागपूर : गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी काढलेल्या ध्वनीप्रदूषणासंदर्भातील अधिसूचनेवरून निर्माण झालेला संभ्रम पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दूर केला आहे. डीजेवर सरसकट बंदी घालण्यात आलेली नाही. ढोल ताशा, पारंपरिक वाद्ये आणि कायदेशीर मर्यादेत वाजवली जाणारी साऊंड सिस्टिम यांना कोणतीही बंदी नाही, केवळ निर्धारित डेसिबल मर्यादेपेक्षा अधिक ध्वनी निर्माण करणाऱ्या मल्टीलेयर साऊंड सिस्टिम, प्लाझ्मा आणि प्रेशर मिड श्रेणीतील साऊंड सिस्टिमवर कारवाई केली जाणार असल्याचे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत कलम 163 अन्वये पोलीस आयुक्तांच्या अधिकारात ही अधिसूचना काढण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांना जास्तीत जास्त 60 दिवसांपर्यंत अशी अधिसूचना लागू करण्याचा अधिकार आहे. जन्माष्टमी, मारबत उत्सव, गणेशोत्सव, नवरात्र तसेच ताजुद्दीन बाबांच्या छब्बीसीसह, आगामी विविध सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही अधिसूचना लागू करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये मल्टीलेयर डीजेसह ‘लेझर लाईट’ आणि ‘बीम लाईटच्या’ वापराबाबतही नियम करण्यात आले आहेत. विशेषतः वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करून मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या साऊंड सिस्टिमवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. अशा सिस्टिममध्ये बेस, मिडियम आणि टॉप असे तीन स्तर असतात. बेस साऊंडमुळे मोठ्या प्रमाणात कंपन निर्माण होऊन त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. अशा साऊंड सिस्टिमचा आवाज 125 डेसिबलपेक्षाही अधिक होण्याची शक्यता असल्याने त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

नांगरे पाटील पुढे म्हणाले की, “यात संगीताला बंदी नाही. ढोल-ताशाला बंदी नाही. उत्सव साजरा करताना पारंपरिक वाद्यांना बंदी नाही. फक्त डेसिबल लिमिट पाळणे गरजेचे आहे, अधिसूचनेच्या शेवटच्या परिच्छेदात कायदेशीर मर्यादेत आवाज निर्माण करणाऱ्या साऊंड सिस्टिमला नागूपरमध्ये बंदी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाबाबत निश्चित केलेल्या मर्यादांचे पालन करून साऊंड सिस्टिम वाजवली गेल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार नाही, मल्टीलेयर साऊंड सिस्टिम, प्लाझ्मा आणि प्रेशर मिडमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन कायद्यांतर्गत ध्वनीप्रदूषणाचे उल्लंघन गंभीर स्वरूपाचे असून त्यासाठी शिक्षेची तरतूद असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयानेही या विषयाची गंभीर दखल घेतली आहे.”

“गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी जागृती आणि लोकशिक्षणाच्या उद्देशाने सुरू केला. आज हा उत्सव गावागावात, गल्लीगल्लीत पोहोचला असून लाखो युवक त्यात सहभागी होतात. त्यामुळे हा उत्सव रचनात्मक पद्धतीने साजरा करायचा आहे, ध्वनीप्रदूषणाच्या नियमांबाबत सर्व धर्मांच्या सण-उत्सवांसाठी समान भूमिका राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. सध्याची अधिसूचना 60 दिवसांसाठी असून, आवश्यकतेनुसार त्याचे नूतनीकरण केले जाईल,” अशी माहितीही विश्वास नांगरे पाटलांनी दिली.

दरम्यान, गणेशभक्तीशी आपले वैयक्तिक नाते असल्याचे सांगताना नांगरे पाटील म्हणाले, “मी स्वतः सिद्धिविनायक मंदिराला जात असतो. नागपुरात टेकडी गणेश मंदिरातही जातो. माझ्या दिवसाची सुरुवात गणपती स्तोत्राने होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर बंदी घालण्याचा प्रश्नच नसून, केवळ ध्वनीप्रदूषणाच्या मर्यादांचे पालन करून उत्सव साजरा करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed