उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत आहेत. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिंदेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांनी आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यानंतर बुधवारी (2 सप्टेंबर) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. ज्येष्ठ वकील नीरश किशन कौल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. त्यांनी शिवसेना पक्षात नेमकं बंड का झालं? याबद्दल सविस्तर घटनाक्रम सांगितला. तसेच 2018 च्या पक्षाच्या घटनेबाबतही वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. 2018 ची घटना ही लोकशाहीवादी नव्हती, असा युक्तिवाद त्यांनी केला. पक्षात एकाधिकारशाही होती, असा आरोप शिंदेंच्या वकिलांनी केला.
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे देखील आज दिल्लीला आहेत. एकनाथ शिंदे यांच्या काही महत्त्वाच्या बैठका दिल्लीत होत्या. तसेच सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वकिलांसोबत चर्चा करण्यासाठीदेखील आपण दिल्लीत आल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर सुनावणी पार पडल्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“चर्चा सुरु झालेली आहे. शिवसेनेची बाजू मांडण्याचं काम सुरु झालं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची घटना आणि विचार नंतर कसे पायदळी तुडवले हे महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांची घटना आणि विचार सगळंच बदललं. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये त्यांनी बहुमत गमावलं. बाळासाहेबांचे विचार गोठवलं, जनतेचं बहुमत गोठवलं, हिंदुत्व गोठवलं, आता धनुष्यबाणही गोठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने जो निर्णय घेतला तो सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या सर्वांच्या पाठिशी आहे. जनतेने आम्हाला स्वीकारलं आहे, आशीर्वाद दिला आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्हीच खरी शिवसेना, शिंदेंचा दावा
“खरी शिवसेना आम्हीच आहोत. आम्ही दुसऱ्या पक्षात गेलोय का? शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला आहे. आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही. आम्ही बहुमताने शिवसेना पक्षात राहिलो. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार बदलले त्यांनी दुसरा निर्णय घेतला. हा सर्व न्यायप्रविष्ट भाग असल्यामुळे या विषयावर स्पष्टीकरण आणि विस्तीर्णपणे बोलू शकत नाही”, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.
‘लोकशाहीत बहुमत हेच महत्त्वाचं’, शिंदेंची प्रतिक्रिया
“बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली. पक्ष संघटनेच्या पदांसाठी निवडणुका वगैरे काही नाही तर नियुक्त्या होऊ लागल्या. मनमानी होऊ लागली. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, माझी शिवसेना विचारधारेपासून दूर होऊ शकत नाही. माझी काँग्रेस होऊ शकत नाही. अन्यथा मी दुकान बंद करेन. पण त्याउलट विपरित जे काही घडलं ते महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे लोकशाही मानणारे, बाळासाहेबांचे विचार मानणारे आम्ही आहोत. त्यामुळे लोकशाहीत बहुमत हेच महत्त्वाचं असतं”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
शिंदेंच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?
शिंदेंच्या वकिलांना 2018 ची पक्षाची घटना ही लोकशाहीवादी नव्हती, असं म्हटलं. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत निवडणूक लढवली. पण निकालांनंतर ज्यांच्याविरोधात निवडणूक लढली त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. यामुळे पक्षात मतभेद झाले. यातून पक्षात उठाव झाला, असा युक्तिवाद शिंदेंचे वकील कौल यांनी केला. यावेळी कौल यांनी पक्षात एकाधिकारशाही असल्याचा आरोप केला.
बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेली 1999 ची घटना का बदलली गेली? बाळासाहेबांच्या काळात निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले. पण नंतर पक्षात संघटनात्मक पदांसाठी निवडणुका झाल्या नाहीत. बाळासाहेबांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन केलं. पण उद्धव ठाकरेंनी केले नाही, असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांनी केला.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा