• Wed. Sep 2nd, 2026

Shiv Sena Hearing : शिवसेनेची सुनावणी रंगतदार मोडवर, पक्षात बंड का झालं? शिंदेंच्या वकिलांनी सांगितलं कारण, वाचा A टू Z युक्तिवाद

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. या युक्तिवादात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. तसेच पक्षातील घटनाक्रम सांगतला.

नवी दिल्ली/मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रतच्या प्रकरणाच्या निकालाविरोधात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी पार पडली. सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या प्रकरणी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादात विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगवेगळे असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. तसेच धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली होती.

ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेता म्हणून नियुक्ती हे बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच त्या काळात निर्माण झालेले सरकारही बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला होता. ठाकरेंच्या वकिलांकडून निवडणूक आयोगावरही ताशेरे ओढण्यात आले होते.

उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून विस्तृत युक्तिवाद करण्यात आल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. एकनाथ शिंदे यांचे वकील नीरश किशन कौल यांनी सोमवारच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीत युक्तिवाद केला. आजच्या सुनावणीनंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

निवडून आलेले संघटनेत असावेत, शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद

दाखल केलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त काही मुद्दे नीरश किशन कौल यांच्याकडून मांडण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोग 1999 पासून विविध पक्षांना पत्र लिहून पक्षाची लोकशाहीवादी घटना असावी, असं सांगत आहे. तसेच पक्षाच्या घटनेनुसार निवडून आलेले लोक संघटनेत असावेत, असा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी केला. “काही पक्ष हुकूमशाहीसारखे आहेत. यामध्ये अनेक पक्ष असू शकतात. शिवसेनेने सांगितलं की, आम्ही तसं करु. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यानुसार पक्षामध्ये कारवाई करायला सांगितलेलं”, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

2018 ची पक्षाची घटना लोकशाहीवादी नसल्याचा दावा

“शिवसेना पक्षाच्या घटनेत 2018 मध्ये जे बदल केले होते ते निवडणूक आयोगात सादर केले होते. पण ते लोकशाहीवादी नाही, असा युक्तिवाद कौल यांनी केला. घटनेनुसार निवडून आलेले लोक संघटनेत हवेत. पक्ष संघटनेत नियुक्त केलेले अनेक लोक निवडून आलेले नाहीत”, असा देखील युक्तिवाद कौल यांनी केला. “निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांचा उपयोग केला. जोपर्यंत कुठलाही पक्ष आवश्यक कागदपत्रे वेळेत सबमीट करणार नाही तोपर्यंत निवडणूक आयोग काय करणार?”, असा सवाल कौल यांनी केला.

2018 च्या पक्षाच्या संविधानात अनेकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. निवडणूक आयोगाने पक्षाचे संविधान आणि निवडणुकांचा वेगवेगळा विचार केला. निवडणुकीत मिळालेल्या जागा आणि टक्केवारी महत्त्वाची असते. सुभाष देसाई प्रकरणात हा मुद्दा नमूद केला आहे, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

Maharashtra TimesRajendra Singh Rana Case : ठाकरेंच्या वकिलांचा शेवटचा डाव, राणा प्रकरण ठरणार गेमचेंजर? शिंदे अडचणीत, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या A टू Z

फ्लोअर टेस्टबद्दल भाष्य

व्हीप हा विधीमंडळ पक्ष नियुक्त करत असतो. फ्लोअर टेस्टनुसार विधीमंडळातील संख्या हा महत्त्वाचा निकष आहे. निवडणूक आयोग पक्ष संघटना आणि विधीमंडळ पक्षाशी संवाद करु शकतो, असा युक्तिवाद कौल यांनी केला. तसेच सुभाष देसाई प्रकरणात निवडणूक आयोगाने अधिकार वापरावेत, असं स्पष्ट म्हटलं आहे.

पक्षात बंड का झालं? शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद

“2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत निवडणूक लढली. नंतर वेगळा होण्याचा निर्णय घेतला. ज्यांच्याविरोधात निवडणुका लढल्या त्यांच्यासोबत युती केली. पक्षात मतभेद होते. पण पक्षात एकाधिकारशाही होती म्हणून कुणी आवाज उठवू शकत नव्हतं. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत युती केली. त्यामुळे पक्षात उठाव झाला”, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

कौल निवडणूक आयोगाबद्दल काय म्हणाले?

निवडणूक आयोगाने एका रात्रीत निर्णय घेतला नाही. आयोगाने निर्णय घेण्यापूर्वी बैठका झाल्या. आयोगाने भूमिका जाणून घेतली, असा युक्तिवाद कौल यांनी केला. ठाकरे गट वेळोवेळी निवडणूक आयोगात आणि कोर्टात गेले. त्यावेळी वेळोवेळी त्यांचे मुद्दे ऐकले गेले, असं कौल म्हणाले.

2018 ची पक्षाची घटना ही नियमानुसार नव्हती. 2018 च्या पक्षाच्या घटनेत अचानक बदल केले. हे बदल निवडणूक आयोग कसे मान्य करणार? कारण ते लोकशाहीवादी नव्हते. नेमणुका लोकशाहीवादी नव्हत्या, असा युक्तिवाद कौल यांनी केला. 1966 मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर पक्षाला चिन्ह मिळालं. नोंदणीकृत पक्ष म्हणून चिन्ह मिळालं, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

कौल बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणाले?

“बाळासाहेब हयात असताना अध्यक्षच प्रमुख असतील, असं आयोगाला सांगितलं होतं. प्रत्येक प्रमुख पदासाठी निवडणूक होईल, असं आयोगाने सांगितलेलं. तसेच बाळासाहेब हयात असताना प्रमुख पदांसाठी निवडणुका झाल्या होत्या”, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

“पक्षांतर्गत निवडणुका घ्या, असं निवडणूक आयोगाने वेळोवेळी सांगितलं होतं. पक्षांतर्गत निवडणूक न घेणं हे बॉसगिरीला बळ देणारं आहे. ही पद्धत म्हणजे सदस्यांना अधिकारापासून दूर ठेवणं आहे”, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

“पक्षप्रमुखांचं ऐकलं नाही म्हणजे नेते चुकले असं होत नसतं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षघटनेत अचानक बदल करण्यात आले. पण निवडणूक आयोगाने सांगितलेल्या गोष्टी उद्धव ठाकरेंनी ऐकल्या नाहीत. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना प्रमुखपद गोठवलं. 2013 मध्ये पक्षप्रमुखपद तयार केलं गेलं. एका सहीने जबाबदारी मिळत असेल तर कार्यकर्त्यांचं महत्त्व कुठे?”, असा सवाल नीरज किशन कौल यांनी केला.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा