रत्नागिरी, दि. २ (जिमाका): मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी खेड येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या मोहिमेत मतदारांची गैरसोय होऊ नये आणि प्रारूप मतदार याद्या सहज उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने प्रशासनाने तत्परतेने काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
आयुक्त रुबल अगरवाल यांनी विविध ठिकाणांना भेटी देऊन व्यवस्थेची खातरजमा केली. तहसील कार्यालय, खेड येथे भेट देऊन तिथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीची बारकाईने तपासणी केली. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ सहाय्यता कक्षा’च्या कामकाजाची माहिती घेतली.
एल. पी. इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील चार मतदान केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील प्रारूप मतदार यादीची पाहणी केली. नागरिकांना सहजपणे नावे तपासता यावीत, यासाठी प्रारूप मतदार यादी दर्शनी भागातच लावण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
खेड पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन तेथील मतदार यादी प्रसिद्धी प्रक्रियेचा आढावा घेतला. तसेच यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींशी संवाद साधून प्रारुप मतदार यादीत मतदारांना आपले नाव तपासायला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, प्रांताधिकारी वैशाली पाटील, खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे, दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोम्बे उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे खेड पंचायत समितीच्या सभापती डॉ. अफिया पालेकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम आणि जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
०००