मुंबई, दि. २ सप्टेंबर : विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व पर्यावरणपूरक उपक्रमांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने मुंबई येथील ‘बालभवन’ येथे विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षण उपक्रमास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गणेशमूर्तींची पाहणी केली.
यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्छिद्र प्रताप सिंह तसेच शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री. भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या कलाकृतींची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून साकारलेल्या गणेशमूर्तींचे त्यांनी कौतुक करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून कलाकौशल्य विकसित करण्याची संधी मिळत असून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक मूर्तींच्या वापराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होण्यास या उपक्रमाची मदत होत आहे.
0000000