• Sat. Sep 5th, 2026

Ajit Pawar: गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असं ‘बाबा’ आता म्हणतायत, पण अजितदादांनी ९ वर्षांपूर्वीच दिलेली आतली माहिती, काय म्हणालेले?

Gopinath Munde: गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच अजित पवार यांनी नऊ वर्षांपूर्वी केलेलं वक्तव्यही चर्चेत आलं आहे.

गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेस प्रवेश अन् पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, पण ९ वर्षांपूर्वीच अजितदादांनी सांगितली होती आतली बातमी(फोटोLipi)
मुंबई: भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे हे २०११ साली काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच केला. “मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांना आम्ही काँग्रेसमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. या प्रवेशासाठी सोनिया गांधी यांची परवानीही घेण्यात आली होती. मला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, पोटनिवडणूक लढावी लागेल, भाजपचे नागपूरचे दोघेजण मला निवडून येऊ देणार नाहीत, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मला मंत्री करावं, अशी मागणी मुंडे यांनी केली होती. त्यावर मी त्यांना सांगितलं की लगेच कॅबिनेट मंत्री करणं शक्य आहे की नाही, हे पाहावं लागेल. पण राज्यमंत्रिपद दिलं जाईल. त्यानंतर आमच्या गुप्त बैठका झाल्या. रात्री २ वाजता आम्ही दिल्लीतील महाराष्ट्र सदनात न भेटता एका हॉटेलवर बैठक घेतली. त्यानंतर सगळं ठरलं होतं. पण गोपीनाथ मुंडे हे भाजपचे लोकसभेतील उपनेते होते आणि विरोधी पक्षाच्या खासदाराला आपण पक्षात घेऊन मंत्री करू नये, अशी भूमिका तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी घेतल्याने हा प्रवेश होऊ शकला नाही,” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

भाजपचे विविध नेते गोपीनाथ मुंडेंबाबतचा हा दावा खोडून काढत असताना काँग्रेसचे माजी खासदार हुसने दलवाई यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला दुजोरा देत माझीही गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा झाली होती, असं म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते जरी आता गोपीनाथ मुंडे यांच्या प्रवेशाच्या चर्चांबाबत बोलू लागले असले तरी राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र नऊ वर्षांपूर्वीच याबाबतचा गौप्यस्फोट करत राजकीय खळबळ उडवून दिली होती.

दिवंगत अजित पवार हे आपल्या हजरजबाबीपणासाठी आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जात. जे पोटात, तेच ओठात अशी त्यांची ख्याती होती. २०१७ साली एका वृत्तवाहिनीवर त्यांची मुलाखत झाली. या मुलाखतीदरम्यान त्यांना धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेत्यांना तुम्ही पक्षात घेऊन कशी इतर राजकीय कुटुंबात फूट पाडली, याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर आपली बाजू मांडत असताना धनंजय मुंडे यांना आम्ही वर्षभर पक्षात घेतलं नव्हतं. मात्र आम्ही पक्षात घेत नसल्याने ते भाजपमधून दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी चाचपणी करत असल्याने अखेर आम्ही त्यांना राष्ट्रवादीत घेतलं, असा खुलासा अजित पवारांनी केला होता. त्यानंतर आपला मुद्दा पुढे मांडताना अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या प्रयत्नाबाबत खळबळजनक दावा केला.

अजित पवार यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं की, “गोपीनाथ मुंडे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यासोबत त्यावेळी भाजपचे पाशा पटेल, प्रकाश शेंडगे, माधुरी मिसाळ, पंकजा मुंडे आणि अन्य एक असे पाच आमदार काँग्रेसमध्ये येणार होते. दिल्लीत त्यांचा पक्षप्रवेशही ठरला होता. मात्र त्यावेळी अचानक तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणाले की, मी पंतप्रधान असताना विरोधी पक्षातील भाजपचे उपनेते असलेल्या गोपीनाथ मुंडेंना अशा पद्धतीने प्रवेश दिलेला मला चालणार नाही. अशा पद्धतीने पक्ष फोडायचा नसतो. मनमोहन सिंह यांनी अशी भूमिका घेतल्यामुळे गोपीनाथ मुंडे यांची अडचण झाली. ते तर सगळा ताफा घेऊन पक्षप्रवेशासाठी गेले होते. मग त्या गाड्या तशाच घेऊन ते सुषमा स्वराज यांच्याकडे गेले आणि मग स्वराज यांच्या मध्यस्थीने पक्षांतर थांबलं, असं दाखवलं गेलं,” असा दावा अजित पवारांनी तेव्हा केला होता.

“गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत असताना मी राज्यात सरकारमध्ये होतो. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत भाजपचे इतर आमदार जाऊ नयेत, यासाठी देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे सगळेजण प्रयत्न करत होते,” असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं होतं.

दरम्यान, आता पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत केलेल्या दाव्यानंतर अजित पवार यांनी नऊ वर्षांपूर्वी सांगितलेल्या या घटनाक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.